पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत युवावर्ग त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती. तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांची काळजी आणि उपचार यावर टास्कफोर्स मार्गदर्शन करत आहे. रुग्णालयातील बेड्स वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांसाठी एनआयसीयू, व्हेंटिलेटर्सची सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार असून, त्यामध्ये भरीव वाढ होणे आवश्यक आहे.
लहान मुलांना लस अद्यापही मिळालेली नाही. तिसऱ्या लाटेपर्यंत लस मिळण्याची शक्यता नाही. त्याचसोबत, २० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांमध्ये लसीकरण आणि कोरोनासंसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती तयार झालीये. मात्र मुलांमध्ये संसर्ग जास्त नसल्याने त्यांना धोका आहे असं तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्र सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा सामाना करतोय. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने प्रशासन व जनतेकडून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत माणिक गावडे यांनी व्यक्त केले आहे.