पुणे : कोरोनाची लस टोचण्यासाठी रुग्णालयात सुरू असलेली लगबग, प्रत्येक टप्प्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सज्जता, लस देण्यासाठी डॉक्टर व परिचारिकांची तयारी... अन् तो क्षण जवळ येतो. एक एक टप्पा पार केल्यानंतर २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार औंध जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २) लसीकरणाची रंगीत तालीम (ड्राय रन) पार पडली. प्रत्यक्ष लसीकरणाच्या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने रुग्णालयातील २५ आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणाच्या रंगीत तालीमसाठी निवड केली होती. रुग्णालयामध्ये सर्व यंत्रणा सज्ज केल्यानंतर सकाळी नऊ वाजता लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. निवड केलेले कर्मचारी लसीकरणाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची ओळख पटविणे व तापमान तपासून प्रतिक्षा कक्षात पाठविले जात होते. तिथे ‘को-विन’ पोर्टलच्या आधारेही त्याची खातरजमा केली.
ओळख पटल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणासाठी दुसऱ्या खोलीमध्ये त्यांना पाठविले जात होते. लस टोचल्यानंतर प्रत्येकाचे पुढील ३० मिनिटे निरीक्षण करण्यात आले. लसीकरणानंतर विपरीत परिणाम झाल्यास त्याच्या पुर्वतयारीची चाचपणीही यावेळी केली. जवळपास अडीच ते तीन तास ही रंगीत तालीम सुरू होती. दरम्यान, रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला.