- धनाजी कांबळेपुणे : निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. वंचित आघाडीनही २८८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना आता मतदारांंपर्यंत पुन्हा नवे चिन्ह पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे.निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला दिले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत कसा टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.‘वंचित’ने ठिकठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही प्रक्रिया मंदावली होती. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील राजगृहावर अॅड. आंबेडकर यांची नुकतीच भेट घेतली. मात्र, जागावाटपाबाबत तोडगा निघालेला नाही. आंबेडकर आणि गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसला ३१ जुलैचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आघाडीबाबत साशंकता असल्याने कार्यकर्त्यांनी सर्वच जागा लढविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही, असे ‘वंचित’चे प्रवक्ते अमोल पांढरे यांनी सांगितले.काँग्रेसकडून ९६ जागांची आॅफरविधानसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून, त्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ९६ जागा देण्याची आॅफर दिली आहे. मात्र हा प्रस्ताव अमान्य करून, काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातील काही जागा इतरही पक्षांना वाढवून द्याव्यात, अशी मागणी अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘वंचित’ची २८८ जागा लढविण्याची मोर्चेबांधणी, कपबशी गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:20 AM