पुणे: मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला सुरुवात होऊन ३२ दिवस झाले. ही रेल्वे मुंबईहून पुणेमार्गे सोलापूरला आणि परत मुंबईला दररोज धावते. या रेल्वेला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. यामुळे रेल्वेला ४.३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
रेल्वे नं. २२२२५ मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्निनस, दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी मार्गे सोलापूरला जाते. मागील ३२ दिवसांमध्ये २६ हजार २८ प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वेला २.०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. रेल्वे नं. २२२२६ सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने २७ हजार ५२० प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेला २.२३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
वंदे भारत रेल्वेत एकावेळी १ हजार १२८ प्रवासी प्रवास करतात. १ हजार २४ चेअर कार आणि १०४ एक्झिक्युटिव्ह चेअर कारची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत. मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील ९ वी वंदे भारत रेल्वे आहे.