गोष्ट आहे ६००० पत्त्यांच्या राजाची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:34 PM2018-05-24T19:34:46+5:302018-05-24T19:34:46+5:30
पत्ते किंवा इंग्रजीत कार्ड्स ! अनेकांनी लहानपणी पाच तीन दोन, झब्बू, बदाम सात अशा प्रकारात पत्ते खेळले असतील. काही जणांना तर त्याचे व्यसनही लागलेले बघायला मिळते. पण पुण्यात एक पत्त्यांचा राजा राहतो ज्याच्याकडे थोडे थोडके नव्हे तर तब्बल ६००० पत्ते आहेत.
पुणे : पत्ते किंवा इंग्रजीत कार्ड्स ! अनेकांनी लहानपणी पाच तीन दोन, झब्बू, बदाम सात अशा प्रकारात पत्ते खेळले असतील. काही जणांना तर त्याचे व्यसनही लागलेले बघायला मिळते. पण पुण्यात एक पत्त्यांचा राजा राहतो ज्याच्याकडे थोडे थोडके नव्हे तर तब्बल ६००० पत्ते आहेत.
शहरात सध्या दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन सुरु आहे. ते बघण्यासाठी अनेकजण बालगंधर्व कलादालनात गर्दी करत आहेत. त्यातील वसंत हरी आपटे यांचा पत्त्यांचा कोपरा विशेष गर्दी खेचून घेत आहे. जगात आहेत तेवढे सर्व विषयांचे पत्ते त्यांच्या संग्रहात आहेत. प्राणी, पक्षी, नट, नट्या, नाणी, निसर्ग, उत्स व असा एकही विषय नाही ज्याला त्यांच्या संग्रहात स्थान नाही. या छंदाला त्यांनी केलेली सुरुवातही मोठी रंजक आहे. मूळचे साताऱ्याचे असलेले वसंत हरी आपटे यांनी २४ ऑगस्ट १९६०पासून या संग्रहाला सुरुवात केली. आयुष्यात काढलेला पहिला रेल्वे पास ठेवण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिकचे कव्हर घेतले. त्यात त्यांना एक पत्ता दिसला, आवडला आणि सुरुवात झाली संग्रह करायला.
सध्या त्यांच्याकडे असलेले सर्व पत्ते असेच सापडलेले आहेत. अगदी सहज फिरायला गेले आणि रस्त्यात पडलेला पत्ता उचलला असेही काही दुर्मिळ पत्ते मिळाले. पुढे पुढे तर त्यांचा छंद इतका लोकप्रिय झाला की अनेकजण त्यांना स्वतःहून पत्ते आणून द्यायला लागले. आज त्यांच्या संग्रहात गोल, चौकोनी, टिकली पत्ता, सोनेरी पत्ते आहेत. शम्मी कपूरच्या ५२ चित्रपट असलेले पत्तेही त्यांच्याकडे आहेत. विन्स्टन चर्चिल याची प्रतिमा असलेला कॅटही त्यांच्याकडे जमा आहे. पत्त्यांसोबत काडेपेटीची खोकी जमावण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांच्यासाठी एका कंपनीने काडेपेटीची अष्टविनायक एडिशन काढली होती. आज त्यांच्याकडे अनेक लहान मुले संग्रह बघण्यासाठी येतात.गंमत म्हणजे आपटे स्वतः कधीही सहज म्हणूनही पत्ते खेळलेले नाहीत. हा माझा संग्रहाचा छंद कायम आनंद देतो आणि देत राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. कुटुंबियांसह ज्यांनी ज्यांनी संग्रह करण्यास मदत केली, वेगवेगळे पत्ते आणून दिले त्यांच्याविषयी आपटे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.