पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात भाषणात राजकीय घडामोडींबरोबर, धार्मिक विषयांना हात घातला. मशीदवरील भोंगे काढा अन्यथा त्यांच्यासमोर भोंग्यावर हनुमान चालीसा लावली जाईल. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यावरून महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून टीकाही होऊ लागली आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचे धाडस मनसैनिक करू लागले आहेत. त्यात, पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनीही अडचण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता पुणे शहराध्यक्ष पदावरुन ते बाजूला झाले आहेत. पुण्याच्या मनसे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली.
''पुण्यात त्यानंतर राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीने या वादामध्ये उडी घेतली आहे. वसंत मोरे आणि मनसैनिकांनी आता आमच्याकडे यावे त्यांना राष्ट्रवादीत नक्कीच प्रवेश दिला जाईल. अशी खुली ऑफर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.''
जगताप म्हणाले, राज ठाकरे गुढीपाडव्याला मांडलेले विचार सामान्य मराठी माणसाला न पटणारे आहेत. मनसेच्या समस्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याच आवाहन मी करत आहे. वसंत मोरे यांचेही पक्षात स्वागत आहे. आपण कुठल्याही जातिधर्मात न अडकता शहर, राज्य, देशाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत यावे. त्यांचा योग्य तो मानसन्मान जपला जाईल.
वसंत मोरेंनी केली होती नाराजी व्यक्त
मी कधीही ठाकरे साहेबांवर नाराज होणार नाही. पण एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झालंय
वसंत मोरेंच्या नवीन शहराध्यक्ष यांना शुभेच्छा
मनसेच्या पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ संभाजी बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. त्यावरून वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. "अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई! अशा शुभेच्छा मारे यांनी दिल्या आहेत.