पुणे लोकसभेत वसंत मोरे असणार मविआचे उमेदवार?; रवींद्र धंगेकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 02:08 PM2024-03-15T14:08:52+5:302024-03-15T14:09:52+5:30
वसंत मोरे सध्या मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मविआ उमेदवारी देणार का हे पाहणे गरजेचे आहे
पुणे - Vasant More in Loksabha ( Marathi News ) येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. मोहोळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीनं अद्याप उमेदवाराची घोषणा केली नाही. मविआत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यासाठी रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी हे नाव चर्चेत होते. त्यात नुकतेच वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत लोकसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे.
वसंत मोरे सध्या मविआच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांना मविआ उमेदवारी देणार का हे पाहणे गरजेचे आहे. तत्पूर्वी याबाबत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, वसंत मोरे काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. भाजपाने मित्रपक्षाचा विचार न करता उमेदवारी घोषित केली. परंतु काँग्रेस मित्रपक्षांचा विचार करून निर्णय घेते. सगळ्यांना विचारात घेऊन काँग्रेस निर्णय घेणार आहे. मी काँग्रेसचा उमेदवार नाही. अद्याप पक्षाने तसं जाहीर केले नाही. माझ्यासह २० जणांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठिशी मी उभा राहायला तयार आहे. कारण मी कार्यकर्ता आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच वसंत मोरे आणि मी एका पक्षात काम केले आहे. ते काँग्रेसमध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्ष घेत असतो. पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांची गरज आहे तसा पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यामागे मी उभा राहणार आहे. मी मित्रासाठी नाही तर काँग्रेस पक्षासाठी माघार घ्यायला तयार आहे असंही धंगेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, पुण्यात मोदींचे मोहोळ आलेत, अजून पुणेकरांचे मोहोळ उठले नाही. ते ज्यादिवशी उठेल तेव्हा भाजपाला आणि त्यांच्या नेत्यांना रणांगणातून पळून जावे लागेल. जनता लाट आहे. फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या मग पुणेकरांचे मोहोळ उठेल ते बघा असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
वसंत मोरेंच्या भेटीगाठी सुरू
मनसेला रामराम केलेले वसंत मोरे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. गुरुवारी मोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोरे भेटले. पुण्यात वॉशिंग मशिन नको, हे माझे मत आहे असं विधान वसंत मोरे यांनी केले आहे.