पुणे- आज पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होत आहे. मात्र, या सभेच्या एक दिवस आधीच मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे पक्षातील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे काही नेते आपण बांधलेली टीम संपविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मोरे यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपल्याबद्दल गैरसमज निर्माण करणारे हे झारीतील शुक्राचार्य आहेत कोण? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. यामुळे मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
मनसे नेते वसंत मोरे आणि पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धुसफूस बघायला मिळत आहे. यातच, जोवर राज ठाकरे येथे येत नाहीत, तोवर आपण पक्षाच्या शहर कार्यालयात पाय ठेवणार नाही, अशी भूमिका मोरे यांनी घेतली होती. यानंतर राज ठाकरे स्वतः वसंत मोरे यांच्याशी बोलणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांचे बोलणे होऊ शकले नाही.
मनसेच्या स्थानिक नेत्यांवर आरोप करताना मोरे म्हणाले, "आम्ही राज ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असतानाच निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या 20 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी एक बातमी कुठूनतरी आली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. पण, या बातमीनंतर लगेचच निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांच्या जागी दुसरा अध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नव्या अध्यक्षाला मुंबईलाही पाठवण्यात आले. माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची एवढी घाई कुणाला झाली होती," असा प्रश्नही वसंत मोरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.