कंठाविष्कारांनी ‘वसंतोत्सवा’स प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:34 AM2021-02-20T04:34:11+5:302021-02-20T04:34:11+5:30
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या वसंतोत्सवास प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, सारस्वत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे, रावेतकर ग्रुपचे ...
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजिलेल्या वसंतोत्सवास प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, सारस्वत बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका स्मिता संधाणे, रावेतकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांचे चिरंजीव बापू देशपांडे, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणूका देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत सुरूवात करण्यात आली. उद्या (दि. २०) आणि रविवारी (दि. २१) सायं ४ ते १० वाजेपर्यंत हा महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.
अंकिता जोशी यांच्या सुरेल गायनाने पहिला दिवसाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी मुलतानी रागातील 'ये गोकुलगांव का छोरा....', 'अजब तोरी बात, अजब तेरो काम...', 'आए मोरे साजनवां' या बंदिशी सादर केल्या. गोविंद दामोदर माधवेती स्तुतीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अभिनय रवंदे (संवादिनी), रामकृष्ण कळंबेकर (तबला), मानसी महाजन आणि आदिती गोसावी यांनी तानपुऱ्यावर साथसंगत केली. यानंतर ज्येष्ठ धृपद गायक पं. उदय भवाळकर यांचे गायनाने उपस्थितांनी धृपद गायिकीची अनुभूती घेतली. पं. वसंतराव देशपांडे यांची १९८२-८३ मध्ये भोपाळला भेट झाली होती. त्या वेळी त्यांचे दर्शन झाले आणि त्यांना ऐकण्याची संधी मिळाली अशा आठवणी पं. भवाळकर यांनी सांगितल्या. त्यांना प्रताप आव्हाड (पखवाज), प्रसन्ना विश्वनाथन आणि चिंतामणी बसू (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
-----------------------------