वटपौर्णिमेला चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:08+5:302021-06-26T04:09:08+5:30
पुणे : ‘‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेसाठी नटून-थटून बाहेर पडणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले. वटपौर्णिमेला चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या ...
पुणे : ‘‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेसाठी नटून-थटून बाहेर पडणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले. वटपौर्णिमेला चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत धुमाकूळ घालून महिलांकडील पावणेदोन लाखांचे दागिने हिसकावले. विश्रांतवाडी तसेच सासवड रस्त्यावर या घटना घडल्या.
याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सासवड रस्त्यावरील देवाची उरूळी गावात राहायला आहेत. तक्रारदार महिला गुरुवारी (दि.२४) दुपारी बाराच्या सुमारास पूजा करून निघाल्या होत्या. हडपसर-सासवड रस्त्यावर सावली होम्स सोसायटीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र आणि राणीहार असा ७५ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक पी. के. हंबीर तपास करत आहेत.
विश्रांतवाडीतील धानोरी भागात महिलेचे एक लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी (दि.२४) दुपारी घडली. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नातेवाईकांबरोबर दुपारी सव्वाचारच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरील चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस उपनिरीक्षक लहू सातपुते तपास करत आहेत.
दरम्यान, पादचाऱ्यांना धमकावून लुटमारीचे सत्र कायम आहे. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील मोबाइल संच हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. संतोष खेडेकर (वय ५१, रा. कात्रज) यांना कात्रज तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरील चोरट्यांनी धमकावून त्यांच्याकडील आठ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक मचाले तपास करत आहेत.
--------------------------