गुन्हेगारी माेडून काढण्याचे आव्हान माेठे.....
गावातील प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा; वाघाेलीकरांची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाघाेली शैक्षणिक हब म्हणून विकसित झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुण- तरुणींचा वावर माेठ्या प्रमाणात असताे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वाघाेलीतील विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे.
भूमाफीयांचा भूखंडांवर असलेला डाेळा लक्षात घेतला पाहिजे. त्यातूनही अनेक प्रश्न निर्माण हाेणार आहेत. त्याशिवाय काेराेनाचा फटका बसलेल्या छाेट्या व्यावसायिकांच्या हितासाठी महापालिका काही करणार का, असेही विचारले जात आहे. गाव समाविष्ट हाेताना प्रत्येक घटकाचा विचार व्हायला हवा, असे मत स्थानिकांकडून व्यक्त हाेत आहे.
“मोठ्या प्रमाणात टोळीयुद्धातून येथे गुन्हेगारी जन्माला आली आहे. दिवसाढवळ्या गावात हत्याकांड घडत होत असेल तर प्रशासन अजून कशाची वाट पाहत आहे? या ‘जंगलराज’ला कोण जबाबदार आहे,” असा संतप्त सवाल करत वाघोलीकरांनी महानगरपालिकेतील विलिनीकरणावर परखड भूमिका मांडल्या. पुण्यालगतच्या २३ ग्रामपंचायतींचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या गावांमधील नागरिकांचे प्रश्न आणि भूमिका समजून घेण्यासाठी ‘लोकमत’ने मोहीम हाती घेतली आहे.
वाहतूककोंडी ही वाघोलीची डोकेदुखी असली तरी गावातील टोळीयुद्धावर कोण बोलणार, असा सवाल तरुणाई करते. नाव न सांगण्याच्या अटीवर वाघोलीतील तरुणाईने ‘लोकमत’कडे भावना व्यक्त केल्या. वाघोलीत नागरिकीकरण आणि औद्योगिकीकरण वाढल्याने झपाट्याने गावाचा विकास झाला. त्याच वेगाने गावात गुन्हेगारीही फोफावली. यातून निर्माण झालेली अस्वस्थता आणि बिघडलेली सुरक्षाव्यवस्था याला आळा घालणे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला कठीण झाले आहे. या टोळीयुद्धात सर्वसामान्यांचा बळी जात असून याचा परिणाम वाघोलीत येणाऱ्या गुंतवणुकीवर होईल, असे वाघोलीकरांना वाटते.
“नोकरी करणाऱ्या महिलांना रात्रीची शिफ्ट असते. अशा वेळी महिलांना सुरक्षा कोण देणारॽ वाघोलीचा समावेश महापालिकेत झाला तरी आम्ही निडरपणे रात्रबेरात्री फिरू शकणार आहोत का,” असा प्रश्न वाघोलीतील सर्वसामान्य महिलांनी उपस्थित केला. कोरोना टाळेबंदीत लघुउद्योगांवर घाव बसला. छोटे व्यावसायिक आर्थिक तोटा सहन करून बेरोजगार झाले. यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मग अशा वेळी सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत अशी बिरुदावली मिरवणाऱ्या वाघोली ग्रामपंचायतीने नागरिकांना आणि नुकसानपीडित लघुउद्योगधारकांना का मदत केली नाही, असा प्रश्न येथील छोट्या व्यावसायिकांनी विचारला.
तीनशे एकरचे क्षेत्र गायरानाखाली असताना आम्हा तरुणांना खेळण्यासाठी मैदान कुठे आहेॽ लोहगाव रस्त्यावर क्रीडांगणासाठी जागा सोडली होती. त्यावरही आता भूमाफियांचा डोळा आहे. महानगरपालिकेने आम्हाला खेळण्यासाठी सुसज्ज मैदान द्यावे, अशी मागणी तरुण करतात. राज्य शासन आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण प्रकल्प राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित करतात पण झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब वाघोलीकरांचे काय, असाही प्रश्न आहे.
कोट
गुन्हेगारी हा जरी मुद्दा संवेदनशील असला तरी मागील काही काळापासून गावातील गुन्हेगारी कमी झाली ही वस्तुस्थिती आहे. अर्थात प्रशासनाची जबाबदारी कमी झाली आहे, असे म्हणता येणार नाही.
- नोकरदार महिला.
.......
पाण्याची टंचाई असून नागरिकांना पाणी मिळत नाही. गाव महानगरपालिकेत गेले तर निदान वेळेवर पाणीपुरवठा होईल, अशी आशा आहे.
- व्यावसायिक.
......................
वाघोली मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. अफाट शहरीकरणामुळे गावाचं सौंदर्य नाहीसं होऊन वाघोली बकाल होऊ नये. लवकरात लवकर महानगरपालिकेत विलीनीकरण व्हावे!
- महाविद्यालयीन विद्यार्थी.
......
फोटो आहे