पुणे : बकऱ्या चोरण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्या कुरेशी टोळीतील एकाला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ॲलेक्स लॉरेन्स ग्रॅम्स (वय २१, रा. कासारवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २८ लाख ३६ हजार रुपयांच्या २६ दुचाकी, ६ चारचाकी व ४ रिक्षा जप्त केल्या आहेत. याशिवाय ४ बकर्या चोरीचे गुन्हे असे एकूण ४० गुन्हे उघडकीस आले.
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख उपस्थित होते. २९ ऑक्टोबर रोजी खडकीतील एका सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी ॲलेक्स हा पळून गेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी यांना ॲलेक्सविषयी माहिती मिळाली. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करुन ॲलेक्सला अटक करण्यात आली.
ॲलेक्स हा कुरेशी गँगचा सक्रीय सदस्य असून त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून प्रथम दुचाकी गाडी चोरायची. त्यानंतर त्याच गाडीवर तीनचाकी व चारचाकी गाड्या चोरायचले. चारचाकी व तीन चाकी गाडी चोरुन त्या चोरलेल्या गाडीतून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, अहमदनगर, सोलापूर व इतर जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बकर्यांच्या गोठ्यातून बकर्या चोरत. परत चोरलेल्या गाड्यांचे नुकसान करुन निर्जनस्थळी सोडून देत असत.
चोरलेल्या बकऱ्या ते १४ ते १५ हजार रुपयांना विकत असत.
याबाबत उपायुक्त पंकज देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले की, या टोळीने जवळपास ७० हून अधिक बकऱ्याचा चोरल्या असल्याचे आरोपी सांगतो. याशिवाय आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक दत्ता चव्हाण, गुन्हे निरीक्षक शफील पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक प्रताप गिरी व त्यांच्या १२ कर्मचाऱ्यांनी केली आहे.