लोणी काळभोर : कोरोना चाचणीसाठी मृतदेहाचा एक्सरे काढण्याचे कारण पुढे करून ससुन रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेमधील मृतदेह स्विकारण्याबाबत टोलवाटोलवी केली. यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत एका अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह चार तासाहुन अधिक काळ शवविच्छेदनाशिवाय पडुन राहिल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी ( ७ ऑगस्ट ) रोजी उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी बुधवार ( ५ ऑगस्ट ) रोजी मृतदेहासोबत पोलीस कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करून ससुन रुग्णालयात काम करणाऱ्या पोलिसांनी व रूग्णालय कर्मचारी यांनी दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या दरवाज्यात चार तासाहुन अधिक काळ पडुन ठेवल्याची घटना उघडकीस आली होता. कदमवाकवस्ती ( ता.हवेली ) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापुर महामार्गावर झालेल्या अपघातात शेतकरी मणीलाल शिवाजी कोळपे (वय ४०, रा. बोरी भडक ता. दौंड) हे मृत्यूमुखी पडले होते. अपघातानंतर कोळपे याची हालचाल होत आहे हे लक्षात येताच रुग्णवाहिका चालकाने कोळपे यांना तात्काळ रुग्णालयात हलविले होते. मात्र रुग्णालयात नेत असतानाच, कोळपे यांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर कोळपे मृतदेह ससुन रुग्णालयात पोचल्यावर, कोळपे यांच्या मृतदेहासोबत स्थानिक पोलीस आले नसल्याचे कारण सांगून रुग्णालय कर्मचाऱ्यांनी व ससुन रुग्णालयात काम करणाऱ्या पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या दाराजवळ तब्बल ४ तास पडुन ठेवला होता. आज शुक्रवारी ( दि.७ ) रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे - सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी ( ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या अपघातात एक ३५ वर्षीय अनोळखी इसमाचाा जागीच मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृतदेह घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ चितारे, त्यांचा एक सहकारी व रुग्णवाहिका चालक अण्णा बालगुडे ससुन रुग्णालयात सकाळी १० - ३०वाजण्याच्या सुमारास पोहचले. रुग्णालयात पोचताच चितारे यांनी मृतदेह आणल्याची रितसर माहिती ससुन रुग्णालयाच्या ४० नंबर काउंटरवर दिली. अधिकाऱ्याने मृतदेह आल्याची नोंद करुन घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यास सांगितले. मात्र शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा एक्सरे काढल्याशिवाय मृतदेह स्विकार नसल्याचा पवित्रा घेतला. यावर चितारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयाच्या ४० नंबर कांउटरवर आणला. त्यानंतर तब्बल ४ तासाहुन अधिक काळ एक्स रे कोण काढणार ? या वादातुन मृतदेह एक्सरे खोलीत पडून होता.
पोलीस हवालदार सोमनाथ चितारे - मृतदेह ४० नंबर कांउटरवर प्रथम आणला त्यावेळी कांउटरवरील अधिकाऱ्याने मृतदेह एक्सरे काढण्यासाठी पाठवायला हवा होता. मात्र अधिकारी व ससुन कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने ४ तासापेक्षा अधिक वेळ मृतदेह पडुन होता. मृतदेहाची हेळसांड होत असल्या बाबतची कल्पना कांउटरवरील अधिकाऱ्यांना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. कोरोनाच्या चाचणीसाठी मृतदेहाचा एक्सरे काढण्याबाबत दुमत नाही. मात्र ही व्यवस्था सुधारण्याची गरज आहे.