पुणे : तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी सन १९६० मध्ये महापालिकेच्या नव्या भव्य वास्तूचे उद्घाटन केले. आता सन २०१८, बरोबर ६० वर्षांनी विद्यमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू पुन्हा महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी २१ जूनला येत आहे.जमिनीपासून ७२ फूट उंचीवर असलेल्या गोल घुमटाखालील २४० सदस्यांच्या, १५० प्रेक्षकांच्या व ६० अधिकाऱ्यांच्या अत्याधुनिक यांसारख्या देखण्या सभागृहाचे लोकार्पण उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ही माहिती दिली. स्थायी समितीचे सभापती योगेश मुळीक यावेळी उपस्थित होते. १५ फेब्रुवारी १९५० मध्ये तत्कालीन नगरपालिकेचे विसर्जन करून महापालिकेची स्थापन करण्यात आली. त्यानंतर सन १९५८ मध्ये सध्याच्या इमारतीचे उद्घाटन झाले. सन १९९० मध्ये नुतनीकरण करण्यात आले.सन २००२ मध्ये बहुमजली वाहनतळ बांधण्यात आला व आता तब्बल १४ हजार चौरस मीटर क्षेत्रावरील पाचमजली विस्तारीत इमारतीचे उपराष्ट्रपतींच्याच हस्ते उद्घाटन होत आहे, असे महापौरांनी सांगितले.या कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत उपस्थिती राहणार आहेत टिळक म्हणाल्या इमारतीच्या तळमजल्यावर सर्व विभागांसाठी एकत्रित नागरिक सुविधा केंद्र, एक खिडकी योजना कक्ष, पोस्ट आॅफिस, बँक एटीएम, पीएमपीएलचे पास केंद्र असेल.पहिल्या मजल्यावर विविध पक्ष कार्यालये व नगरसचिव कार्यालय करण्यात आली आहेत. दुसऱ्या मजल्यावर सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्षनेता व विविध समिती अध्यक्षांची दालने तसचे स्थायी समिती सभागृह, इतर विषय समिती सभागृह, पत्रकार कक्ष व विविध पक्ष पदाधिकारी कार्यालय बांधण्यात आली आहेत. तिसऱ्या मजल्यावर ७२ फूट व्यासाचे घुमटाकार मूख्य सभेच्या सभागृह व महापौर दालन आहे. इमारतीसाठी अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, ६ उद्वाहने व विजेची बचत एलईडी दिव्यांची विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे. विजेचा अपव्यय टाळण्यासाठी अत्याधुनिक बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टिम बसविण्यात आली आहे. मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा व अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम बसविण्यात आली आहे. सदर इमारतीचे बांधकाम पर्यावरणपूरक निकषांन्वये करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज अग्निशमन यंत्रणा व फायर अलार्म सिस्टिम करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे ४८ कोटी ७५ लाख रूपये इतका खर्च झाला.
उपराष्ट्रपती ते उपराष्ट्रपती व्हाया ६० वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 2:25 PM
१९६० साली महापालिकेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन तत्कालीन उपराष्ट्रपतींच्या झाले होते. तसाच योग पुन्हा एकदा जुळून येतोय...
ठळक मुद्देमहापालिकेचे वर्तुळ पूर्ण : नव्या विस्तारीत इमारतीचे २१ जूनला उद्घाटन मुख्य सभागृहामध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा व अत्याधुनिक डिजिटल कॉन्फरन्स सिस्टिम