पिटाच्या गुन्ह्यातील पिडितेचा न्यायालयातून पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:48+5:302021-01-17T04:11:48+5:30
पुणे : जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असलेल्या प्रकरणात सुटका केलेल्या पिडित मुलीने शनिवारी शिवाजीनगर न्यायालयातून पलायन केले. दिवसभर ...
पुणे : जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असलेल्या प्रकरणात सुटका केलेल्या पिडित मुलीने शनिवारी शिवाजीनगर न्यायालयातून पलायन केले. दिवसभर या मुलीचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात कात्रज परिसरात भारती विद्यापीठ पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकत ४ मुलींची सुटका करत त्यांची रवानगी रेस्क्यू होम मध्ये केली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र लवकर दाखल करुन जामीनासाठी मदत करावी, यासाठी महिला पोलीस हवालदार श्रद्धा अकोलकर यांना ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोन दिवसांपूर्वी कारवाई करून अकोलकर यांना अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधित मुलीला हजर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन धोत्रे व पोलीस कर्मचारी या ४ मुलींना घेऊन शिवाजीनगर न्यायालयात आले होते. त्यांच्यातील एका मुलीने स्वच्छतागृहात जाण्याचा बहाणा करुन तेथून पळ काढला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.