पुणे (लोणीकंद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील 1 जानेवारी रोजी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासन मानवंदना कार्यक्रम शिस्तबद्ध प्रातिनिधिक स्वरूपात व साध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख केले.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभ 1 जानेवारी रोजी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रम तयारीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उप विभागीय अधिकारी सचिन बारवकर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली तहसिलदार सुनिल कोळी, शिरुरचे तहसिलदार लैला शेख, नायब तहसिलदार श्रीशैल वट्टे, कार्यकारी अभियंता जे. ए. थोरात, किशोर शिगोंटे, अ. द. कोकाटे, सी. एम. ढवळे, कोरेगाव भीमा विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सरपंच रुपेश ठोंबरे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले,संपूर्ण देश मागील ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील अनेक सण-उत्सव व सामाजिक,राजकीय कार्यक्रम सार्वजनिक पद्धतीने न करता साधेपणाने साजरे केले आहे. प्रशासनाला कुठलाही जात, धर्म नसतो. कर्तव्ये महत्त्वाची असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, मनपा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, परिवहन आणि आरोग्य अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींची आढावा घेण्यात आली. त्यात कोरोना संपला असे म्हणता येणार नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात साध्या पद्धतीने मानवंदना कार्यक्रम होणार आहे असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने प्रातिनिधिक स्वरूपात व साध्या पद्धतीने मानवंदना कार्यक्रम करण्यात येणार आहे. प्रशासन व पोलीस यंत्रणेला आमचे पूर्ण सहकार्य राहील.- सर्जेराव वाघमारे अध्यक्ष, कोरेगाव भीमा विजय स्तंभ समिती.: