Pune: उजनीच्या पात्रात घुसला बैलगाडा, शहा गावात रंगला ‘बैलगाडा शर्यतीचा’थरार; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 09:04 PM2023-06-12T21:04:06+5:302023-06-12T21:04:40+5:30
शर्यतीचा भिर्रर्र... आवाज घुमला अन्...
बाभूळगाव (पुणे) : शहा (ता. इंदापूर) येथे शर्यतीसाठी घाटाची रचना सदोष असल्याने शर्यतीदरम्यान एक गाडा थेट उजनीच्या पात्रात घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे आयोजकांसह प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. बैलगाडा शर्यतीदरम्यान नदीपात्रात घुसलेल्या बैल आणि गाड्यासह चालक वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात सुदैवाने यश आले.
शहा येथे अकरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्यांदा उजनीकाठी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त व माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडा शर्यतीचा भिर्रर्र... आवाज घुमला.
मात्र, शर्यतीसाठी घाटाची निर्मिती उजनी धरण पात्राच्या किनाऱ्यावर करण्यात आल्याने व घाटाची रचना सदोष असल्याने शर्यतीदरम्यान एक गाडा थेट नदीच्या पात्रात घुसला. प्रसंगावधान राखल्याने दोन बैलांसह चालकाचा जीव जाता जाता थोडक्यात वाचला. तर दुसऱ्या अपघातात ज्येष्ठ नागरिक शिवाजी बाबू गंगावणे (रा. शहा, ता. इंदापूर) गंभीर जखमी झाले. तर अन्य दोन जण जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर एक प्रेक्षक घाटाच्या मध्येच गेल्याने तोही जखमी झाल्याचे समजत आहे.
...उजनीच्या पात्रात घुसला बैलगाडा, शहा गावात रंगला ‘बैलगाडा शर्यतीचा’थरार#Punepic.twitter.com/Yre2CiroG2
— Lokmat (@lokmat) June 12, 2023
दरम्यान, बैलगाडा शर्यतीमधील विजेत्याला आमदार केसरीचा मानाचा किताब व एक लाख दहा हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली. या वेळी अमोल पाटील (रा. शहा) यांच्या राहुल्या व संजय चव्हाण (रा. खोरोची) यांच्या भवानी नावाच्या संयुक्त बैलजोडीने प्रथम, शौर्य दैवत गोवेकर रा. लोणंद द्वितीय आणि बापूजी बुवा (रा. जांभळवाडी) तृतीय क्रमांक पटकावला. राज्यातील अनेक वेळा हिंदकेसरी ठरलेला बकासुर या बैलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बैलगाडा शर्यतीचे आयोजन अमोल ऊर्फ सोनू पाटील व विश्वजीत मारकड यांनी केले.