VIDEO : जिवाशी खेळ! भर रस्त्यात रुग्णवाहिका उभी करून चालकाचे गुत्त्यावर फुल्ल मद्यप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 07:51 PM2021-01-20T19:51:02+5:302021-01-20T19:57:54+5:30
... अन् मद्यप्राशन करणाऱ्या रुग्णवाहिकाचालकाने ठोकली धूम;बोपोडी येथील प्रकार
पिंपरी : रुग्णवाहिकेच्या चालकाला देवदूत तर रुग्णवाहिका म्हणजे जीवनवाहिनी होय. मात्र यातील काही चालक मद्यपान करून अपघातांना निमंत्रण देत आहेत. एका सजग नागरिकाने मोबाईल फोनमध्ये चित्रीकरण करून असाच एक प्रकार उघडकीस आणला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकाला मद्यप्राशन करताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे त्याला धूम ठोकावी लागली.
पुणे येथील बोपोडी येथे बुधवारी (दि. २०) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. रिषभ सेठिया यांनी मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी येथे दारु विक्रीचे दुकान आहे. या दुकानाच्या परिसरात महामर्गावर एक रुग्णवाहिका बराच वेळ उभी असल्याची माहिती सेठिया यांना मिळाली. त्यांनी पाहणी केली असता रुग्णवाहिकेचा चालक तेथे दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी चालकाचा शोध घेतला. त्यांनी दारु विक्रीच्या दुकानात जाऊन पाहणी केली. तेथे काही जण मद्यप्राशन करीत होते. बाहेर अॅम्बुलन्स कोणी उभी केली आहे, असे सेठिया यांनी विचारले. माझी आहे अॅम्बुलन्स, मी उभी केली आहे, असे एक तरुण म्हणाला. ती जागा आहे का अॅम्बुलन्स उभी करण्याची, असे सेठिया म्हणाले. त्यानंतर दारुची बाटली तसेच ग्लास घेऊन तो तरुण बाहेर गेला. त्याने अॅम्बुलन्स घेऊन पळ काढला.
...अन् मद्यप्राशन करणाऱ्या रुग्णवाहिका चालकानं धूम ठोकली https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/6HgHcWHXIl
— Lokmat (@MiLOKMAT) January 20, 2021
महामार्गावर सिग्नलजवळील प्रकार
महामार्गावर सिग्नलजवळ हा प्रकार घडला. येथे सिग्नल असल्याने मोठी वर्दळ असते. तसेच वाहने भरधाव जातात. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. भर रस्त्यात वाहने उभी केली जातात. अशा वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
रुग्णवाहिकेचा चालक निर्व्यसनी असावा. रुग्णाला जीवदान देण्यासाठी त्याला वर्दळीतून वाट काढून रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिका घेऊन जायची असते. मात्र काही चालकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांना अपघात होऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दुखापत होऊन जीव गमावण्याची वेळ येऊ शकते.
- रिषभ सेठिया, बोपोडी