VIDEO : पुणेकरांनी जपला बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा
By Admin | Published: January 23, 2017 03:29 AM2017-01-23T03:29:12+5:302017-01-23T09:16:38+5:30
लक्ष्मण मोरे / पुणे ‘व्यंगचित्रकारांनी भल्याभल्या हुकूमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. १०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. व्यंगचित्रकाराची ...
लक्ष्मण मोरे / पुणे
‘व्यंगचित्रकारांनी भल्याभल्या हुकूमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. १०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. व्यंगचित्रकाराची एक नजर असते. लोक वृत्तपत्रांच्या ओळी वाचतात आणि व्यंगचित्रकार ओळींमधल वाचतो,’ असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. मराठी मनाचा मानबिंदू आणि शिवसेनाप्रमुख त्यांची एक प्रतिमा असली तरी एक व्यंगचित्रकार म्हणूनही बाळासाहेबांची स्वतंत्र ओळख आहे. पुणे महापालिकेने त्यांच्या नावाने उभारलेल्या व्यंगचित्र कलादालनाला प्रतिसाद मिळत आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर महापालिकेने त्यांच्या नावाने व्यंगचित्र कलादालन उभे केले. त्याचे उद्घाटन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २२ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आले होते. या व्यंगचित्र दालनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून चितारलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे मांडण्यात आलेली आहेत.
स. का. पाटील यांच्यावर काढलेले व्यंगचित्र छापू नका, असे संपादकांनी सांगितल्यामुळे त्यांनी फ्री प्रेसच्या नोकरीचा राजीनामा दिला. विन्स्टन चर्चिल यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरित्रात व्यंगचित्रे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये जी तीन व्यंगचित्रे भारतातून देण्यात आली ती सर्व व्यंगचित्रे बाळासाहेबांनी रेखाटलेली होती. पुढे त्यांनी नोकरी सोडून आॅगस्ट, इ. स. १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) सुरू केले.
आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी भल्याभल्यांना
जेरीस आणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनाप्रमुख पदापर्यंतचा प्रवास मोठा संघर्षपूर्ण आहे. त्यांचा १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरेंचा पुण्याशी कायमच भावनिक ॠणानुबंध राहिला आहे. पुण्यामध्येही त्यांना राजकीय आणि वैयक्तिक मित्र मोठ्या प्रमाणावर लाभले. त्यांचा जन्मच पुण्यात झालेला असल्यामुळे पुण्याशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती. ते पुण्यात आले, की टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनीमधील घरी उतरत असत. अशाच अनेक सुहृदांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कलाप्रेमी पुणेकरांना बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे पाहता यावीत, याकरिता महापालिकेने सारसबागेजवळ त्यांच्या नावाने कलादालन उभे केले आहे. या कलादालनामध्ये अधूनमधून कार्यक्रम होत असतात. दररोज तुरळक प्रमाणात काही नागरिक भेट देतात. मात्र, एक वर्षात महापालिकेने या दालनाकडे प्रेक्षक आकर्षित होतील, यासाठी फारच तुटपुंज्या उपाययोजना केल्या आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844p3w