पुणे: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (mns raj thackeray) यांना पुणे दौऱ्यावर असताना एक वेगळाच अनुभव आला आहे. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परभणीचे जिल्ह्यातील एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली. याला राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या बाळाचे नामकरन केले. निशांत आणि विशाखा कमळू हे दाम्पत्याच्या मुलाचे नाव राज ठाकरे यांनी यश असे ठेवले. राज ठाकरे यांच्याकडून चार महिन्यांच्या चिमुरड्याचं नाव ठेवण्यासाठी हे दाम्पत्य थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले होते.
केसरीवाड्यातील बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज ठाकरे यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले होते. पण नंतर मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' हे नाव दिलं. निशांत हे गेली १४ वर्षे राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते तर आहेतच, शिवाय मनसेचे पदाधिकारीही आहेत.
यापुर्वीही पुण्यातील एका दौऱ्यात एका लहान मुलानं राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड केलेली बघताना राज ठाकरेंनी स्वतः त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. विशेष म्हणजे सभोवताली गर्दी असल्याने वही ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेते वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवत त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. त्यामुळे राज ठाकरे एका नेत्याच्या पलीकडे चिमुकल्यांचेही लाडके आणि आपल्या चिमुकल्या चाहत्यांना न दुखवणारे असे नेते आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळतं. खासकरुन लहान मुलं राज ठाकरेंना फार आवडतात.