भारतीय राजकारणी समाज कॅन्सरपीडित : विक्रम गोखले; पुण्यात वीर जीवा महाले पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:51 PM2017-11-27T14:51:32+5:302017-11-27T14:57:45+5:30
भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात केली.
पुणे : भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. हे भारतासाठी फारच त्रासदायक असून या राजकारणाला असे वाईट कृत्य करण्याचा कॅन्सर झाला आहे व पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर केली.
नातूबाग मैदान येथे शिवप्रताप दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार कोल्हापूरचे बजरंग दल प्रमुख संभाजी साळुंखे यांना देण्यात आला. यावेळी माजी आमदार अशोक मोडक, डॉ. एस. के. अंबिके, तरुण शिवव्याख्यानकार सौरभ कर्डे, समस्त हिंदू आघाडी कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते. तसेच हिंदू शौर्य पुरस्कार मालेगाव हिंदू आघाडी समाजसेवक मच्छिंद्र शिर्के यांना देण्यात आला.
गोखले पुढे म्हणाले, की सत्ता टिकवून ठेवणे, आमची बाजू कोणती तुमची बाजू कोणती अशा गोष्टी राजकारणात सतत घडत आहेत. तरुणांनी देशाच्या राजकारणात सहभागी होण्याचा विचार केला नसेल तर त्यांनी राजकारणाचे भान ठेवावे आणि राजकारणाचा भाग म्हणून रहावे. तुम्ही घरात बसून, टाळ्या वाजवून, मोबाईल हातात घेऊन फिरत बसण्यापेक्षा देशाच्या भविष्याचा विचार करावा. सर्वांनी शरीराने, मनाने, विचाराने मजबूत व्हा. तुमच्या नजरेतून शत्रू पळाला पाहिजे. हिंदू हा धर्म नाही तर ही संस्कृती आहे. ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते. शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात नव्हते तर ते आपल्या देशाच्या, स्वराज्याच्या, मातीच्या जो विरुद्ध जाईल त्यांच्याशी लढले. जगातील एकमेव संस्कृती ही हिंदू आहे तिचा अभिमान ठेवा.
मोडक म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने हिमालय ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारतभर आपला ठसा उमटवला आहे. तरीसुद्धा आपल्या राजधानीमध्ये अफजलगुरु सारख्यांची आरती होते, हा भारताला लागलेला काळिमा आहे.
अंबिके म्हणाले, की महाराष्ट्रातल्या तरुणांनी आर्मी, एअरफोर्समध्ये सामील व्हावे. आणि देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा. कार्यक्रमात पोवाडा गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकिशोर एकबोटे यांनी केले.