प्रशासनाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे आरो प्लांट बंद आहे, त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आले आहे. गाव जरी पाण्याने भरलेल्या नदीच्या तीरावर असले तरी पिण्यासाठी शुद्ध पाणी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने वाॅटर फिल्टर प्लांट सुरू करण्यात आला होता. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या वॉटर प्लांट पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. येलवाडी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ घरोघरी पाहावयास मिळत आहे.
दरम्यान, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे लक्षात येताच काही वॉटर एटीएम सेंटरने अन्य ठिकाणाहून वाहतूक करुन प्रक्रिया केलेले पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याची कामगिरी काही विक्रेत्यांनी पार पाडली. सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकांची गरज ओळखून आपल्याकडील पिण्याचा पाणीसाठा खुला केला आहे.
येलवाडी गावात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आहे त्यामुळे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतात काम करावे लागते. त्यातच आपल्या मिळालेल्या वेळेत पाणी आणण्यासाठी फिल्टर प्लांट जावे लागते. परंतु ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वॉटर फिल्टर प्लांटला वेळेचे बंधन असल्यामुळे इतर दिवशीही नागरिकांची अडचण निर्माण होते. त्यामुळे फक्त रात्रीच्या वेळी वॉटर फिल्टर प्लांट बंद करावा व नागरिकांसाठी दिवसभर खुला करण्याची मागणी माजी सरपंच नितीन गाडे यांनी केली आहे.
येलवाडी गावातील पिण्याचा पाण्याचा वाॅटर फिल्टर प्लांट पाच दिवसापासून बंद आहे.