कडबनवाडी परिसरात वनक्षेत्र व वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी राज्य शासनाचा वतीने पर्यटन केंद्र विकसित करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना फायदा होणार असला तरी या पर्यटन केंद्रामुळे लोकांची, शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने या ठिकाणी पर्यटन विकास अथवा सुविधा उभारण्यात येऊ नये, ग्रामस्थांचा याला मोठा विरोध असून या पर्यटन केंद्राबाबत २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत याठिकाणी कोणत्याही प्रकारची कामे सुरू करू नयेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
रविवारी (दि. २६) काही अधिकारी याठिकाणी काम सुरू करण्यासाठी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी ग्रामसभा होईपर्यंत काम थांबविण्याची मागणी केली. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे तसेच तहसीलदार यांनाही निवेदन दिले आहे व पर्यटन केंद्रास विरोध दर्शविला आहे. काम सुरू ठेवल्यास तहसील कचेरीवर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे निवेदन संतोष चवरे, रामभाऊ गावडे, बबन गावडे, गणेश हगारे, संतोष गावडे, दादा गावडे, संजय चव्हाण यांनी दिले आहे.