रावणगावला जखमी माकडाचे प्राण वाचविण्यात ग्रामस्थांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:42+5:302021-05-17T04:10:42+5:30
रावणगाव येथे विद्युत तारेचा शॉक लागून अत्यावस्थ झालेल्या माकडावरती योग्यवेळी आणि योग्य तो उपचार केल्याने माकडाचे प्राण वाचविण्यात ...
रावणगाव येथे विद्युत तारेचा शॉक लागून अत्यावस्थ झालेल्या माकडावरती योग्यवेळी आणि योग्य तो उपचार केल्याने माकडाचे प्राण वाचविण्यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीलाल आटोळे आणि रावणगाव ग्रामस्थांना यश आले.
रावणगावमध्ये माकडांच्या दोन टोळ्या आहेत. ग्रामदैवत शिरसाईदेवी आणि येथील देवीची माकडे हे अनन्यसाधारण नातं आहे असं मानलं जाते.
ही घटना रावणगाव (ता. दौंड ) येथे शनिवार ता. १५ रोजी शिरसाई देवीच्या यात्रेदिवशीच घडली. कुत्र्याने माकडाचा रावणगावचे ग्रामदैवत शिरसाई देवी मंदिर परिसरात पाठलाग केल्याने आपला जीव वाचविण्यासाठी माकड विजेच्या खांबावर चढले असता, त्याला विद्युत तारेचा शॉक लागून २० फूट उंचीवरून जमिनीवरती कोसळले. त्यामुळे त्याच्या हाताला, जबड्याला आणि छातीला जबर दुखापत झाली आणि माकड बेशुद्ध पडले.
उपस्थित ग्रामस्थ दत्तात्रय नाळे आणि नारायण फाजगे यांनी या घटनेची माहिती रावणगावचे रहिवासी आणि बोरिबेल येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - १ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीलाल आटोळे यांना फोनवरून दिली. डॉ. आटोळे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत त्या जखमी माकडावर ग्रामस्थांच्या मदतीने योग्य उपचार केल्यामुळे या माकडाचे प्राण वाचविण्यात यश आले.
या माकडाची तब्येत आत्ता एकदम व्यवस्थित असली तरी त्याला एका खोलीमध्ये ठेवून त्याच्या खाण्यापिण्याकडे आणि औषधोपचाराकडे ग्रामस्थ बापूराव आटोळे, नारायण फाजगे आणि दत्तात्रय नाळे हे लक्ष ठेवून आहेत.