पुणे : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एका संघटनेचे नाव तपासात समोर आले आहे. या संघटनेशी सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हा संबंधित असल्याचा युक्तीवाद शुक्रवारी तावडेच्या जामीन अर्जाला विरोध करताना सरकारी पक्षाकडून करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ़. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात तावडे यांचा जामीन विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी फेटाळून लावला आहे. यापूर्वीही तावडेचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. वीरेद्रसिंह तावडे, विनय पवार, सारंग अकोलकर आणि इतरांच्या मदतीने दाभोलकरांची हत्या केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याने दोन वर्षापूर्वी याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलनाविषयी बोलतात, संत लोकांविरुद्ध, देवाबद्दल अनुद्गार काढतात, चमत्काराला आव्हान देतात़, आदींंमुळे त्याची हत्या करण्यात आल्याचेही सीबीआयने आरोपपत्रात नमूद केले होते. सीबीआयने १ जून २०१७ रोजी तावडे याच्या पनवेल येथील घरी तसेच सनातन संस्थेच्या आश्रमावर छापा टाकला होता़. सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी तावडेला अटक केली होती. याप्रकरणी विविध साक्षीदारांचे साक्षीपुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेले संशयितांचे फोटो, रेखाचित्रे, वीरेेंंद्रसिंह तावडे याच्या घरी व सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे, दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मुलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे असलेली हार्ड डिक्स जप्त करण्यात आल्या होत्या. याप्रकरणात गेली दोन वषार्पासून तावडे हा अटकेत असून त्याला जामीन मंजूर करण्यात यावा. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या बोलण्यात तफावत आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही अद्याप जप्त करण्यात आली नाही. उच्च न्यायालयाने त्याच्या आरोप निश्चितीसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे तावडे यांना जामीन देण्यात यावी अशी मागणी बचाव पक्षाचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी केली. जामीनाला विरोध करताना विशेष सरकारी वकील मनोज चलाडन यांनी युक्तीवाद केला की, यापूर्वीही तावडेचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन मिळावा यासाठी कोणतेही ठोस कारण नाही. तसेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात समोर आलेल्या एक संघटनेशी तावडेचा संबंध आहे. त्यामुळे त्याचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. तावडेला जामीन दिल्यास पुराव्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने तावडेचा जामीन फेटाळून लावला आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संघटनेशी वींरेंद्रसिंह तावडेचा संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 8:23 PM
सीबीआयने १० जून २०१६ ला कॉ़. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी वीरेेंंद्रसिंह तावडेला अटक केली होती.
ठळक मुद्देवीरेेंंद्रसिंह तावडेला जामीन दिल्यास पुराव्यांवर दबाव येण्याची शक्यता, जामीन अर्ज फेटाळला