वाघोलीेला मिळणार दुसरा बायपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:19 PM2018-05-09T18:19:27+5:302018-05-09T18:19:27+5:30
खराडी बायपास दर्गा ते इआॅन आयटी पार्क-वर्ल्ड ट्रेड सेंटरहून पुढे मांजरी-आव्हाळवाडी-केसनंद मार्गे नगर रस्ता असे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
अभिजित कोळपे
पुणे : वाघोलीतील वाहतूकोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या वतीने (पीएमआरडीए) विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नुकतीच याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. खराडी बायपास दर्गा ते इआॅन आयटी पार्क-वर्ल्ड ट्रेड सेंटरहून पुढे मांजरी-आव्हाळवाडी-केसनंद मार्गे नगर रस्ता असे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
वाघेश्वर मंदिर-भावडी रस्ता ते बकोरी फाटा असा पहिल्या बायपासचे सर्व्हेक्षण झाले असून, पाच सख्या भावांचे एक कुटंब सोडले तर बाकी इतर कोणाचाही या बायपास रस्त्याला विरोध नाही. त्यामुळे या कुटुंबाचा मागण्या लवकरात लवकर सोडवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी अशा आहे. तर आणखी एक पर्यायी बायपास करावा यासाठी खराडी बायपास दर्गा-मांजरी-आव्हाळवाडी-केसनंद फाटा मार्गे नगर रस्ता पीएमआरडीएने नुकतेच सर्व्हेक्षण केले आहे. खराडी बायपास ते इआॅन आयटी पार्क-वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंत सिमेंटचा रस्ता अगोदरच तयार आहे. पुढे दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता करावा लागणार आहे. त्यासाठी या मार्गासाठी लागणाऱ्या जमीन मालकांना समृद्धी महामार्गाच्याप्रमाणे मोबदला मिळाल्यास आम्ही जागा देण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
उर्वरित रस्ता इतर क्षेत्रातून न्या
वाघोलीतून होणाऱ्या २ किलोमीटर १०० मीटरच्या रस्त्याला तीन-चार बांधकाम व्यावसायिकांनी जागा दिली आहे. तसेच इतरही स्थानिक नागरिक जागा देण्यास तयार आहेत. मात्र विरोध असणारे एकमेव तांबे कुटुंब आहे. या तांबे कुटुंबाची सर्वच्या सर्व पावणेतीन एकर जागा या रस्त्यात जात आहे. त्यामुळे त्यांचा जागा देण्यास विरोध आहे. गणेश तांबे यांनी सांगितले, की आमच्या पावणेतीन एकर क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रातून रस्ता नेण्यास आमचा विरोध नाही. त्याचा योग्य मोबदला मिळावा. उर्वरित रस्ता इतर क्षेत्रातून न्यावा. कारण पूर्ण रस्ता आमच्या क्षेत्रातून नेल्यास आम्हाला याठिकाणी जागाच उरत नाही. आम्ही थेट विस्थापित होत आहोत. तसेच योग्य मोबदला देण्याचे ठोस आश्वासनही आम्हाला मिळालेले नाही. लोकांना देशोदडीला लावून शासन कोणत्या प्रकारचा विकास करत आहे.
....................
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला द्या
वाघेश्वर मंदिर-भावडी रस्ता ते बकोरी फाटा जो बायपास फुलमळामार्गे सर्व्हे झाला आहे. त्यामध्ये आमचे तांबेवस्ती येथे पावणेतीन एकर क्षेत्र पूर्णत: या रस्त्यामध्ये जात आहे. आम्ही रस्त्यासाठी जागा द्यायला तयार आहोत. मात्र २०१३ च्या कायद्याप्रमाणे आम्हाला मोबदला हवा आहे. मात्र १९६६ च्या जमीन अधिग्रहन कायद्याप्रमाणे पीएमआरडीए आम्हाला मोबदला देऊ असे म्हणते. तो रोख स्वरूपात नसून टीडीआर, एफएसआय आणि टाऊनशिप मध्ये ५० टक्के जागा विकसित करून देण्याचे सांगण्यात आले. मात्र आम्हाला ते मान्य नाही. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आम्हाला मोबदला मिळावा आणि तोही रोख स्वरूपात देण्यात यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. सध्या रोख स्वरूपात मोबदला देण्यास असमर्थ असल्याचे पीएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही या रस्त्यासाठी विरोध दर्शवला आहे. आम्ही कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात नाही. मात्र आम्हाला उदध्वस्त करून जर प्रकल्प होत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. - गणेश तांबे, जमीन मालक, तांबेवस्ती
..................
आमची जागा ताब्यात घेण्यासाठी किंवा जागेबाबत चर्चेसाठी पीएमआरडीएच्या वतीने अद्याप कोणीही संपर्क साधला नाही. काही महिन्यांपूर्वी पीएमआरडीएचे अधिकारी आमच्या जागेचा सर्व्हे करून गेल्याची माहिती मिळाली. मात्र आम्हाला याविषयी काहीच कल्पना नाही. वाघोली बायपाससाठी आमची जागा पीएमआरडीए घेणार असेल तर आम्हाला समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही जागा देणार नाही.
- रतिकांत तांबे, जमीन मालक, तांबेवस्ती