वाघजाईनगर येथील मारहाणीतील इसमाचा रुग्णालयात मृत्यू, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 08:43 PM2018-02-13T20:43:35+5:302018-02-13T20:44:50+5:30
खराबवाडी ( ता. खेड) येथील वाघजाईनगरमधील विंडाल्स प्रोसिजन कंपनीच्या समोर दारूच्या नशेत दगडांनी मारहाण करण्यात आलेल्या एका इसमाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चाकण : खराबवाडी ( ता. खेड) येथील वाघजाईनगरमधील विंडाल्स प्रोसिजन कंपनीच्या समोर दारूच्या नशेत दगडांनी मारहाण करण्यात आलेल्या एका इसमाचा पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या प्रकरणी मंगळवारी तीन संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक नारायणराव मगनाळे ( वय ४५, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे ) असे गंभीर मारहाणीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी किरण शिवाजी जाधव ( वय २६, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. दावडी, ता. खेड, जि. पुणे), कृष्णा मारुती दणगे ( वय १९, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. मुखेड, जि. नांदेड ) व शशिकांत राजाराम आतकर (वय २५, सध्या रा. चिंबळीफाटा, ता. खेड, मूळ रा. येनवे, ता. खेड, जि.पुणे ) या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून चाकण पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
कंपनीचे सुरक्षारक्षक भाऊसाहेब फूजा गुंजाळ ( वय ३८ वर्षे, रा. चाकण ता. खेड जि. पुणे ) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस हवालदार सुभाष पवार, विठ्ठल कुंभार, अमोल जाधव, शेखर कुलकर्णी, संदीप रावते, होमगार्ड चिंतन गारगोटे यांच्या पथकाने तपास करून आरोपींवर गुन्हा दाखल केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाघजाईनगर येथील विंडाल्स प्रोसिजन कंपनीसमोरील रस्त्यावर वरील आरोपी दारू पिऊन पडले होते. यावेळी प्रेम रोडलाइन्समध्ये वाहनचालकाचे काम करणारे मृत माणिक मगनाळे हे रस्त्यावरून जाताना पिलेल्या तिघांना ''पिये है भोसडी के'' असे म्हणाल्याने त्यांच्यात भांडण जुंपले.
यावेळी राग आलेल्या तिघांनी मगनाळे यांना दगड, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांना पिंपरीच्या वाय सी एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपींवर ७ तारखेला भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान मगनाळे यांचा मृत्यू झाल्याने आज चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.