दुस-या ‘हिरव्या’ यादीची प्रतीक्षाच, संतापाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 05:27 AM2017-11-09T05:27:34+5:302017-11-09T05:27:41+5:30
राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही
पुणे : राज्य सरकारने शेतक-यांसाठी घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेसाठीची दुसरी हिरवी यादी अद्यापही बॅँकांना आणि सहकार विभागाला प्राप्तच झालेली नाही. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कुर्मगतीच्या कामामुळे या यादीची शेतक-यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुस-या यादीस लागणाºया विलंबामुळे शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या २ लाख ३९ हजार ७७ शेतकºयांची पहिल्या हिरव्या यादीतील शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी सहकार विभागाने तब्बल ८९९ कोटी १ लाख रुपये आयसीआयसीआय बॅँकेमार्फत विविध ११ सार्वजनिक बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील (डीसीसी) शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यादीमध्ये नावे असलेल्या काही शेतकºयांच्या माहितीमध्ये राहिलेल्या त्रुटी तपासण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या खात्यामध्ये रकमा जमा होऊ शकलेल्या नाहीत. ज्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही, त्यांची पडताळणी तालुका स्तरीय समितीकडून केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, संबंधितांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील हिरव्या यादीमध्ये १ लाख ३८ हजार ४०४ शेतकºयांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली होती, तर १ लाख ६७३ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.