पुणे : महापालिकेच्या हद्दीत तसेच हद्दीजवळ असलेल्या वन विभागाच्या जागांवरील अतिक्रमणांना आता लगाम बसणार आहे. प्रामुख्याने टेकड्यांच्या परिसरात असलेल्या या जागांवर बांधकाम व्यावसायिक तसेच नागरिकांकडून होत असलेली अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक पावले उचलली असून, या सर्व वनक्षेत्रांना संरक्षण भिंतीचे कुंपण घातले जाणार आहे. यापूर्वी पाचगाव पर्वती वनक्षेत्रास महापालिकेच्या माध्यमातून संयुक्त वन व्यस्थापन प्रकल्प कार्यक्रमांतर्गत सीमाभिंत बांधण्यात येत होती. मात्र, इतर ठिकाणी राज्यशासनाच्या निधीतूनच हे काम करण्यात येणार असून, त्याअंतर्गत शहरातील दहा वन क्षेत्रांना संरक्षक भिंत घालण्यासाठी शासनाने नुकतीच ५ कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वन विभागाची जागा पाहता त्यासाठी या विभागास तब्बल ४० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीजवळ वन विभागाची तब्बल ५ हजार एकर जागा आहे. प्रामुख्याने टेकड्यांच्या परिसरात हे वनक्षेत्र आहे. मात्र, शहराची वाढ होताना, तसेच वन विभागाची नेमकी हद्द स्पष्ट नसल्याने या वनक्षेत्रात अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे दाखवून या जागेतील नाले बुजवून मोठ्या इमारतींची बांधकामेही महापालिकेच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे वन विभागाचे शेकडो एकर क्षेत्र अतिक्रमणांनी गिळंकृत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी ही बाब लक्षात घेऊन भविष्यात होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार, भांबुर्डा आणि पुणे वन क्षेत्रातील प्रमुख दहा गावांमध्ये असलेल्या सर्व वनजमिनीला सीमाभिंत घालण्यात येणार आहे. वन विभागाच्या जागेत कचरा आणि राडारोडा टाकण्यासाठी अतिक्रमण करण्याच्या घटनाही वाढत आहेत. प्रामुख्याने वानवडी, महंमदवाडी परिसरात या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच नागरिकांकडून महापालिकेची जागा म्हणून वन विभागाच्या जागेवर झोपड्या टाकल्या जात आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या सर्व जागांना कुंपण घालण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला होता.त्यानुसार, पुढील महिनाभरात याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून पुढील सहा महिन्यांत ही सीमाभिंत बांधण्याचे काम पूर्ण केले जाईल. - सत्यजित गुजर (उप वनसंरक्षक, पुणे विभाग) या ठिकाणी घातली जाणार सीमाभिंत पुणे वनपरिक्षेत्र : वानवडी स. नं. ४९, कोंढवा खुर्द स.नं. ३४, महंमदवाडी स.नं. ७१, ७२, ४५, कोंढवा खुर्द स.नं. २८. भांबुर्डा वनपरिक्षेत्र : वारजे स. नं. १२0, ९६, म्हाळुंगे स.नं. ३८
पुण्यातल्या टेकड्यांना आता भिंतीचे कुंपण
By admin | Published: October 06, 2015 4:55 AM