पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणातील रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी संंपलेल्या २४ तासात घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. डुंगरवाडी १३०, शिरगाव दावडी १२०, लोणावळा ८०, खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोमवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने घाट परिसरातून प्रवासाचा जाताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी.
पुणे शहरात आज दिवसभर आकाश ढगाळ असून अधून मधून पावसाची एखादी जोरदार सर येत होती. पुणे शहरात ९.१ मिमी, पाषाण ११.६ आणि लोहगाव येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली होती.
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी २४ तासात झालेला पाऊस (मिमी)
लवळे १८.५, एनडीए ६, गिरीवन ६२, डुडुळगाव ५, शिवाजीनगर ७, माळीण (आंबेगाव) ५९, तळेगाव ढमढेरे २, पाषाण ११.५, बल्लाळवाडी (जुन्नर) २१, एनईएस लकडी (इंदापूर) ९.५, मगरपट्टा १.५, पाबळ (शिरुर), वडगाव शेरी ३.५, खडकवाडी (आंबेगाव) २, वेताळे (खेड) ८, वाल्हे (पुरंदर) ०.५