पुणे : केडन्स अकादमी आणि व्हेरॉक यांनी अनुक्रमे डेक्कन जिमखाना आणि पीवायसी संघांवर मात करत केडन्स चषट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी (२५ मार्च) डेक्कन जिमखाना मैदानावर ही अंतिम लढत रंगणार आहे.
स्पार्क क्रिकेट मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात केडन्स क्रिकेट अकादमीने डेक्कन जिमखाना संघावर ३९ धावांनी विजय मिळवला. केडन्स क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना ४७ षटकांत नऊ बाद २३४ धावा केल्या. डेक्कन जिमखाना संघाला ४३ षटकांत सर्वबाद १९५ धावांवर रोखून केडन्सने विजय साकारला. केडन्सकडून प्रद्युम्न चव्हाण (नाबाद ७९), हर्षल काटे (४८) आणि अर्शिन कुलकर्णी (४२) यांनी संघाला २३४ पर्यंत नेले. डेक्कनकडून यश बोरामणी याने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
२३४ धावांचा पाठलाग करताना डेक्कनकडून अथर्व वणवे (५२), निकुंज बोबरा (२७) यांनी झुंज दिली. मात्र, इतर फलंदाज अपयशी ठरले. केडन्सकडून शुभम खरातने तीन तर प्रद्युम्न चव्हाणने दोन गडी बाद केले. प्रद्युम्न चव्हाण सामनावीर ठरला.
दुसºया उपांत्य सामन्यात व्हेरॉकने पीवायसीवर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसीचा डाव ४७.५ षटकांत १७६ धावांवर संपुष्टात आला. व्हेरॉकने ३८.३ षटकांत चार बाद १७९ धावा करताना विजय साकारला. पीवायसीकडून श्रेयस वालेकर (३५), आदर्श बोथरा (३३) यांनी झुंज दिली. व्हेरॉककडून हर्षवर्धन पवार याने चार गडी बाद केले. व्हेरॉककडून यश जगदाळे (नाबाद ७६) हर्ष खांदवे (२७) यांनी संघाचा विजय साकारला. हर्षवर्धन पवार सामनावीर ठरला.
संक्षिप्त धावफलक : केडन्स : ४७ षटकांत ९ बाद २३४; प्रद्युम्न चव्हाण ७९, आर्शिन कुलकर्णी ४२, हर्षल काटे ४८. गोलंदाजी - यश बोरामणी ३-४९, प्राज्वल मुंगरे २-३७. डेक्कन जिमखाना : ४३ षटकांत सर्वबाद १९५; अथर्व वणवे ५२, निकुंज बोरा २७. गोलंदाजी - शुभम खरात ३-३९, प्रद्युम्न चव्हाण २-२७.
पीवायसी : ४७.५ षटकांत सर्वबाद १७६; श्रेयस वालेकर ३५, आदर्श बोथरा ३३. गोलंदाजी - हर्षवर्धन पवार ४-३०. व्हेरॉक : ३८.३ षटकांत ४ बाद १७९. यश जगदाळे (नाबाद ७६), हर्ष खांदवे (२७), सूरज गोंड (२५). गोलंदाजी - आदर्श बोथरा १-१३.
फोटो - प्रद्युम्न चव्हाण