पुणे : पेशवेकालीन कात्रज तलाव त्यात सतत पडणाऱ्या सांडपाण्यामुळे आता अखेरच्या घटका मोजायला लागला आहे. महापालिकेने तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करूनही काम होत नाही. त्यामुळे तलावाच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कात्रजमध्ये वरचा आणि खालचा असे दोन तलाव आहे. पूर्वी दोन्ही तलाव एकाच प्रभागात होते. प्रभागांच्या नव्या रचनेत वरचा छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा असलेला तलाव प्रभाग क्रमांक ३८ मध्ये तर त्या खालचा तलाव प्रभाग क्रमांक ४० मध्ये समाविष्ट झाला आहे. दोन्ही तलाव यापूर्वी सुशोभीत करण्यात आले होते. त्यापैकी एकट्या वरच्या तलावावर महापालिकेचे मागील पंचवार्षिकमध्ये तब्बल ११ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तलावाच्याबरोबर मध्यभागी शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. बाजूने सुमारे ७०० मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे. म्युझिकल फाऊंटन आहे. या सर्वांचा आनंद परिसरातील नागरिक घेत होते. खालील बाजूच्या तलावातही तत्कालीन नगरसेवक वसंत मोरे यांनी बरेच काम केले होते. रचना बदलल्यामुळे आता या दोन्ही तलावांकडे स्थानिक पदाधिकाºयांचे तर दुर्लक्ष झाले आहेच व त्यामुळेच प्रशासनही तिथे काही काम करायला तयार नाही. यातील वरचा तलाव तर अखेरच्या घटका मोजत आहेत. त्याच्यापासून साधारण १ किलोमीटर अंतरावर असणाºया गावांमधील सर्व सांडपाणी थेट या तलावात येत असते. रोज हे पाणी येत असल्यामुळे आता तलावात स्वच्छ पाणीच राहिलेले नाही. संपूर्ण तलावात जलपर्णीचे साम्राज्य झाले आहे. सगळीकडे फक्त दुर्गंधी पसरली आहे. तलावाच्या शेजारून जाणेही मुश्किल झाले आहे, जॉगिंग ट्रॅकचा वापर करणे तर दूरच! नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात, मात्र त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही. महाराजांच्या पुतळ्यावरील प्रकाशझोत बंद, फाऊंटन बंद, ट्रॅक बंद अशी तलावाची अवस्था झाली आहे.
त्या गावांमधील ग्रामपंचायतींनी सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईपची व्यवस्था करावी, म्हणून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी वर्गही झाला आहे. महापालिकेने आपल्या हद्दीपर्यंत बंद पाईप आणून ठेवले आहेत. तेही काम मोरे यांनीच करून घेतले. आता गावांमधून सांडपाणी वाहून नेणारे पाईप तिथंपर्यंत आणून ते जोडण्याचे काम करायचे आहे. मात्र ते काम व्हायलाच तयार नाही. साधी निविदा प्रक्रियाही अद्याप झालेली नाही. प्रशासनही यात लक्ष घालत नाही. स्थानिक नगरसेवकही पाहत नाहीत. त्यामध्ये तलावाचे नुकसान होत आहे. जलपर्णी व स्वच्छतेचा अभाव यामुळे या सर्व भागांत डास झाले आहेत. सकाळी तलावाच्या बाजूने नागरिक फिरण्यासाठी म्हणून येत असत तेही आता बंद झाले आहेत. डास चावून लहान मुलांबरोबरच मोठेही आजारी पडत आहेत. नगरसेवक पाहत नसतील तर किमान प्रशासनाने तरी तलावाकडे लक्ष देऊन सुधारणा करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.भाजपाकडे नियोजन नाहीमहापालिकेने निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही काम होत नसेल तर ते चुकीचे आहे. गावे पीएमआरडीएच्या हद्दीत येतात. त्यांनी गावांच्या सांडपाणी वितरणाची व्यवस्था तलावापर्यंत करून दिली पाहिजे. महापालिकेत भाजपाचा सत्ता, पीएमपीआरडीएतही तेच आहेत, पण काय कामे करायची, कोणती गरजेची आहेत, जास्त निकडीची आहेत तेच त्यांना समजत नाही. समजले असते तर शहरातील एक मोठे पर्यटनस्थळ होऊ शकणाºया कात्रज तलावाकडे त्यांनी असे दुर्लक्ष केलेच नसते. अजूनही वेळ गेली नाही, त्यांनी तलावात येणारे सांडपाणी बंद करावे, फक्त जलपर्णी काढून ठेकेदाराचे भले होईल, बाकी काहीही होणार नाही.- दत्तात्रय धनकवडे, माजी महापौरसांडपाणी बंद व्हायला हवेमी नगरसेवक असताना या तलावात कितीतरी कामे करून तो सुशोभीत केला. आता त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. स्थानिक नगरसेवकांचा दबाव असेल तर प्रशासनाला काम करावेच लागते. मात्र दोन राष्ट्रवादीचे व दोन भाजपाचे असे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता नाही. महापालिकेने १० कोटी रुपये दिल्यानंतर सांडपाणी वाहून नेण्याचे काम ग्रामपंचायतीने करून घेतले पाहिजे. ते झाले तरी तलावातील सगळे सांडपाणी बंद होईल व तो स्वच्छ राहील.- वसंत मोरे, नगरसेवकप्रशासनाचे धोरण लवचिक नाहीया भागात काम करताना काही अडचणी आहेत हे खरे आहे. मात्र त्यावर आम्ही मात करतो आहे. तलावाच्या मागील बाजूस नानानानी उद्यान करतो आहोत. त्याची निविदा आता जाहीर होईल. बाकी कामांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यांनीही कामाची निकड ओळखून काम करायला हवे, मात्र त्यांच्याकडून सतत नकारघंटाच वाजवली जाते. नियम, कायदे सांगितले जातात. सार्वजनिक कामे करताना थोडे लवचिक राहावे लागते, हे प्रशासनाच्या लक्षातच येत नाही.- राणी भोसले, नगरसेविकाजलपर्णी काढून उपयोग नाही,पाणी बदलायला हवेतलावातील जलपर्णी काढून टाकली तरी ती पुन्हा होईल. कारण तलावातील पाण्यात फार मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचले आहे. अशा घाण पाण्यातच जलपर्णी वाढते. त्यासाठी आता तलावातील सर्व पाणी सोडून दिले पाहिजे व त्यात पडणारे सांडपाणी कायमचे बंद केले पाहिजे, तरच तलाव सुस्थितीत येईल व कायम तसाच राहील.- राकेश बोराडे,नागरिक