पुणे (विश्रांतवाडी) : येथील विमानतळ रस्त्यावर कस्तुरबा सोसायटीसमोर दुरुस्तीसाठी खोललेल्या जलवाहिनीतून हजारो-लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचा्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. अशातच ऐन उन्हाळच्या तोंडावर दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवले जात आहे. यामुळे एकप्रकारे पालिकेकडून पुन्हा एकदा भोंगळ कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे विनोद पवार म्हणाले, की विश्रांतवाडीत विमानतळ रस्ता परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत आपण पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या जलवाहिनीत अडकलेला कचरा काढण्यासाठी ही जलवाहिनी खोलण्यात आली. जलवाहिनी खोलण्यापूर्वी पाणीपुरवठा बंद करण्याची विनंती आपण अधिकाऱ्यांना केली होती. मात्र तसे न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या गळतीबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी असता, त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे देण्यात आली. तसेच जलवाहिनी दुरुस्त करणारे कर्मचारी अनुभवी नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडला. पालिकेचे शाखा अभियंता बुद्धप्रकाश वाघमारे म्हणाले, सकाळी साडेसातपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी पाणीपुरवठा बंद होता. मात्र दुपारपर्यंत नियोजित वेळेत दुरुस्ती पूर्ण झाली नाही. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नागरिक चौकशी करू लागल्याने दुपारी तीननंतर पाणीपुरवठा सुरू करावा लागल्याने पाण्याची गळती झाली. ही गळती रात्रीपर्यंत थांबवण्यात येईल.
विश्रांतवाडीत जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया; नागरिकांनी व्यक्त केला संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 8:43 PM