मान्सूनच्या पहिल्याच पावसात पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 09:01 PM2019-06-24T21:01:01+5:302019-06-24T21:02:14+5:30
मान्सूनच्या पहिल्याच सरींनी पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल झाले.
पुणे : मान्सूनच्या पहिल्याच सरींनी पुणे विमानतळावरील प्रवाशांचे हाल झाले. जोराच्या पावसामुळे विमानतळाच्या इमारतीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजमधील पाणी तुंबल्याने प्रवाशांना या पाण्यातूनच आत जावे लागले. तसेच टर्मिनल इमारतीपासून विमानापर्यंत पावसात भिजतच जाण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यांचे सामानही भिजल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
देशात सर्वात वेगाने प्रवासी संख्या वाढणाऱ्या विमानतळांमध्ये पुणे विमानतळाचेही नाव आहे. दररोज सुमारे १७५ विमानांची ये-जा विमानतळावरून होते. त्यामुळे हे विमानतळ नेहमीच गजबजलेले असते. सध्या दरवर्षी सुमारे ९० लाख प्रवासी प्रवास करतात. पण सोमवारी झालेल्या पावसाने विमानतळावरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. विमानतळ परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. विमानतळावरील तिकीट खिडक्यांच्या समोरील रस्त्यावरही पाण्याचे तळे साचले होते. त्यातच सांडपाण्याचे ड्रेनेज तुंबल्याने सर्व घाण पाणी रस्त्यावर आले. सुमारे दोन-अडीच तास पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साठले. याच रस्त्यावर प्रवाशांची ने-आण करण्यासाठी वाहने उभी राहतात. मात्र पाणी साठल्याने प्रवाशांना दुसरीकडे उतरावे लागत होते. तिथून उतरून घाण पाण्यातून विमानतळावर प्रवेश करावा लागत होता. पाण्याची दुर्गंधी सुटल्याने प्रवासी तिथे उभेही राहू शकत नव्हते. याबाबत प्रवाशांना सोशल मिडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
विमानात बसण्यापुर्वीही अनेक प्रवाशांना पावसात भिजावे लागले. टर्मिनल इमारतीमधून विमानापर्यंत जाण्यासाठी अनेक विमानतळांवर स्वतंत्र बंदिस्त व्यवस्था करण्यात आलेले आहे. मात्र, पुणे विमानतळावर अजूनही ही व्यवस्था नाही. त्यामुळे सोमवारी प्रवाशांना पावसात भिजतच विमानात प्रवेश करावा लागला. विनित चौब हे पुण्यातून अहमदाबादला निघाले होते. पावसातच त्यांनाही विमानापर्यंत जावे लागले. याबाबत त्यांनी टिष्ट्वटरवर छायाचित्र टाकून नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विमानतळ संचालक अजय कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्रवाशांचे सामानही भिजले
टर्मिनल इमारतीतून विमानापर्यंत जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे सामानही मोठ्या प्रमाणावर भिजले. क्षमतेपेक्षा जास्त सामान असल्याने अनेक प्रवाशांकडून विमान कंपनीकडे सामान नेण्यासाठी जादा पैसे घेतले जातात. हे सामान पोहचविण्याची व्यवस्था कंपनीकडून केली जाते. पण सोमवारच्या पावसाने कंपन्यांच्या व्यवस्थेलाही उघडे पाडले. प्रवाशांच्या बॅग भरपावसात नेल्या जात होत्या. कंटनेरमध्ये ठेवण्यात आलेल्या बॅग झाकण्यासाठीही पुरेशी व्यवस्था नसल्याने बहुतेक सामान भिजून गेले.