ढिसाळ नियोजनाचे दर्शन : दुष्काळातही ३५ दिवस आवर्तन सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 01:34 PM2019-05-11T13:34:03+5:302019-05-11T13:38:59+5:30
६ एप्रिलपासून जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन किती दिवस चालणार हे कुकडी पाटबंधारे विभागालाच माहिती नाही.
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये अवघे २.०१ टक्केच पाणीसाठा शिल्लक असताना पिण्याच्या पाण्याचे आवर्तन ३५ दिवसांपासून सुरू आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यास पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा व आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणांतील पाणीसाठा शून्य टक्के आला आहे, तर वडज धरणात अवघे १.१९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाचे पाणी नियोजन कोलमडल्याने धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही. गेल्या वर्षी आज अखेरीस पाच धरणांमधून ६४४० द.ल.घ.फू. (२१.०९ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गेल्या वर्षी तीन आवर्तने सोडल्यानंतरही पाणीसाठा शिल्लक राहिल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. परंतु यावर्षी पाणीसाठा अवघे २.०१ टक्केच शिल्लक राहिल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. ६ एप्रिलपासून जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन किती दिवस चालणार हे कुकडी पाटबंधारे विभागालाच माहिती नाही. परंतु लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आवर्तन सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पिण्याच्या पाण्यासाठी ४.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी गेल्या ३५ दिवसांपासून ३.६९ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले आहे.
पिंपळगाव जोगा धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर मृत साठ्यातून येडगाव धरणात ९०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या पिंपळगाव जोगा धरणात अवघे १३६८ द.ल.घ.फू. (१.३७ टक्के) मृतसाठा शिल्लक आहे. दरवर्षी पिण्यासाठी या धरणातून मृतसाठा काढला जातो. या वर्षी मृतसाठ्यातील नीचांकी पातळी गाठली आहे. येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे १३०० क्युसेक्स वेगाने सुरू असलेले आवर्तन ३५ दिवस होऊनही सुरूच असल्याने धरणातील साठा हा संपुष्टात येणार आहे. सध्या पिंपळगाव जोगा, डिंभा व वडज या धरणांत पाणीसाठा शिल्लक नाही. माणिकडोहमध्ये अवघे २९२ द.ल.घ.फू. (२.८७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर येडगावमध्ये पिंपळगाव जोगा धरणातील पाणी येत असल्याने येडगाव धरणामध्ये सध्या ३२५ द.ल.घ.फू. (१६.७० टक्के) पाणीसाठा शिल्लक असून, या धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे.
डिंभा धरण शून्य टक्के झाल्याने या धरणातील विसर्ग काल ९ मे रोजीपासून बंद करण्यात आला आहे. धरणांची परिस्थिती पाहता जून महिन्यात मॉन्सून सक्रिय न झाल्यास धरणांमध्ये पाणीसाठा नसल्याने पाण्याची बिकट परिस्थिती प्रथमच निर्माण होणार आहे.
........
जलव्यवस्थापनाचा अभाव , राजकीय उदासिनता
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या धरणांमधून दरवर्षी सोडण्यात येणाºया आवर्तनामध्ये रब्बीसाठी दोन व उन्हाळीसाठी एक आवर्तन अशा तीन आवर्तनांद्वारे १५ ते १८ टीएमसी पाणी सोडण्यात येते. साधारणपणे प्रत्येक आवर्तनास ५ ते ६ टीएमसी पाणी सोडण्यात येते. कालवा सल्लागार समितीची ३ आॅक्टोबर २०१८ रोजी बैठक झाली होती. त्या वेळी २५ आॅक्टोबर २०१८ पासून कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात आले. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्याने एकच आवर्तनामध्ये १४.५ टीएमसी पाणी सोडण्यात आले.
.......
प्रथमच धरणांमध्ये पाणी असतानादेखील ६२ दिवसांचे प्रथम आवर्तन सोडल्याने ऐन दुष्काळी परिस्थतीमध्ये पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन झाले नाही. या वर्षी भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागेल. आज सर्व धरणांची परिस्थिती पाहता अवघे २ टक्केच पाणीसाठा असताना आजही पाण्याचे आवर्तन सुरू आहे. राजकीय उदासीनतेमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून या वर्षी वंचित राहावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.