खडकवासला : सिंहगड किल्ल्याच्या वाड्या- वस्त्यांत गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनांचे बंधारे, तसेच विहिरी, पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत.भीषण पाणीटंचाईने घेरा सिंहगडच्या हद्दीतील सांबरेवाडी, तसेच खामगाव मावळ येथील चांदेवाडी येथील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे प्रशासन या प्रश्नाप्रती ढिम्म आहे. हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात महिला, नागरिक वणवण भटकत आहेत. त्याचबरोबर भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांना जनावरे जगविण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे.>सर्वांत गंभीर स्थिती सांबरेवाडी येथे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील विहिरी, पाणवठे कोरडे ठणठणीत पडले आहेत. येथील नागरिकांना मिळेल तेथून डोक्यावरून; तसेच टेम्पो, मोटरसायकल, वाहनांवरून पाणी आणावे लागत आहे. जलयुक्त शिवारातून बांधलेले गावचे दोन्ही बंधारे कोरडे आहेत. विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या चांदेवाडी येथेही अशीच गंभीर स्थिती आहे.खानापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर सांबरेवाडी खानापूरपर्यंत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाण्याचा पुरवठा होतो. आमच्या वाडीत राजकीय इच्छाशक्ती आणि निधीअभावी अशा योजना पोहोचल्या नाहीत. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले की पाण्याची वणवण सुरू होते. डिसेंबरपासून वर्गणी काढून पाण्याचा टँकर मागवत आहे, तर काही कुटुंबांतील स्त्रिया डोक्यावर हंड्याने पाणी आणतात.- हरिश्चंद्र जोरकर, नागरिक, सांबरेवाडी
जलयुक्त शिवार पडले कोरडे ठाक, नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी वणवण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:26 AM