Video : पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीच्या लिफ्टमध्ये धबधबा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:19 PM2019-06-28T20:19:56+5:302019-06-28T21:12:46+5:30
शहरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या लिफ्टमध्ये पाण्याचा चक्क धबधबा सुरु झाला. ऐवढेच नाही तर संपूर्ण इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणई गळती होत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
पुणे : शहरामध्ये गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नवीन प्रशासकीय इमारतीच्या लिफ्टमध्ये पाण्याचा चक्क धबधबा सुरु झाला. ऐवढेच नाही तर संपूर्ण इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणई गळती होत असल्याने संपूर्ण इमारतीला धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर कार पार्किंगमध्ये देखील सर्वत्र पाणी गळती होत आहे. नवीन इमारतीमधील ही गळती पाहून आयुक्त सौरभ राव यांनी डोक्याला हात लावत तातडीने संबंधित ठेकेदार व इमारतीची देखभाल करणा-या अभियंत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या वतीने तब्बल ४९ कोटी रुपये खर्च करुन नवीन प्रशाकीय इमारत बांधली आहे. या इमारतीचे उद्घाटन गत वर्षी २१ जून रोजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. इमारतीच्या उद्घटानाच्या दिवशीच कार्यक्रम सुरु असताना इमारतीमध्ये पाण्याची गळती सुरु झाली. या पाणी गळतीमुळे संपूर्ण देशात महापालिकेची नाचक्की झाली. त्यानंतर काहीच दिवसांत इमारतीच्या स्लॅबचा तुकडा पडला, नवीन सभागृहात सभा सुरु असताना ठोकळा पडला, यामुळे विरोधकांसह पुणेकरांनी पत्रके काढून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपचा निषेध केला. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे प्रशासनाने तातडीने सीओईपीकडून संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यामध्ये इमारतीला कोणताही धोका नसल्याचा अहवाला सीओईपीकडून देण्यात आला होता. परंतु आता बरोबर एक वर्षांनंतर गुरुवार (दि.२८) रोजी झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली असून, त्यामुळे महापालिका प्रशासनाचे चांगलेच वाभाडे निघाले आहे.
गुरुवारी झालेल्या पावसामुळे इमारतीमधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गळती सुरु झाली की काही वेळातच लिफ्टला धबधब्याचे स्वरुप आले. तळमजल्यामध्ये असलेल्या इमारतीच्या विद्युत कंट्रोल रुममध्ये देखील मोठ्या प्रमाणात गळती असल्याने अखेर कर्मचा-यांनी रुम बंद करून काम थांबविले. तर तिस-या मजल्यावरील सभागृहाच्या व्हारांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आत येत होते.