पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत मुसळाधार पावसाने हजेरी लावली आहे. या चोवीस तासांत तब्बल ६७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर या धरणांचा पाणीसाठा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता १७.४७ टीएमसीवर पोहचला आहे. तसेच या प्रकल्पातील खडकवासला धरणापाठोपाठ टेमघर धरणही भरण्याचा मार्गावर आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आलेला पाण्याचा २७हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सायंकाळी सात वाजता कमी करण्यात आला असून, मुठा नदीत १७ हजार २८0 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच ते गुरुवारी सायंकाळी पाच या कालावधीत या चारही धरणांमध्ये तब्बल ४८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात सर्वाधिक १८१ मिलिमीटर पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वरसगाव आणि पानशेत धरणांचा पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे १0१ आणि १0९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान खडकवासला धरणापाठोपाठा या प्रकल्पातील टेमघर धरणही भरण्याच्या मार्गावर असून, या धरणाचा पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहचला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंदही झालेली आहे. त्यामुळे हे धरणही लवकरच भरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
खडकवासला पोठोपाठ टेमघरही भरण्याच्या मार्गावर
By admin | Published: August 01, 2014 5:31 AM