पुणे : टीव्हीवरील न्यूज चॅनेलमधील व्यक्ती सुटाबुटात येऊन सफाईदारपणे मराठीत, इंग्रजीत बातम्या सांगते. त्याविषयीची छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत दाखवते. अवघ्या काही मिनिटांत साऱ्या जगाचा वेध घेणारी माहिती ती पटापट प्रेक्षकांना सांगत असताना नेहमी एक प्रश्न पडायचा तो असा की, ती व्यक्ती बोलताना अडखळत कशी नाही? तिचा एकही शब्द मागेपुढे कसा होत नाही? कॅमेरासमोर बोलताना तिला सारे कसे लक्षात राहते? लहानग्या विद्यार्थ्यांच्या मनात गर्दी केलेल्या या प्रश्नांचे आणि कुतूहलाचे समाधान तज्ज्ञांकडून झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असलेले समाधान त्यांचा बालदिन सार्थकी लागल्याची साक्ष पटवून देत होते. ‘लोकमत’च्या वतीने बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भोसरीतील इंद्रायणीनगरमधील प्रियदर्शिनी विद्यालयातील व सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन अभ्यास विभागाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी विभागातील स्टुडिओ, आॅडिओ कंट्रोल विभाग, एडीटिंग विभाग यांचे कामकाज कसे चालते हे विभागातील प्राध्यापक संभाजी नलावडे यांच्याक डून समजावून घेतले. याबरोबरच माध्यमे नेमकी कशा प्रकारे काम करतात? टीव्हीवर बातम्या सांगणारा व्यक्ती सलगपणे कसे काय बातम्या सांगतो, इनडोअर, आऊटडोअर शूट म्हणजे काय? याबरोबरच चित्रीकरणाच्या वेळेस प्रकाशयोजनाचे असणारे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी देखील त्यांना माहिती देण्यात आली. बातम्या सांगणाºया व्यक्तीपुढे टेलिप्रॉम्टर नावाचे यंत्र बसविण्यात आल्याने त्यावर ठळक अक्षरात लिहिलेल्या बातम्या ती व्यक्ती वाचत असते. त्याबरोबरच सामान्य प्रेक्षकाला सलग वीस मिनिटे दिसत असलेला कार्यक्रम प्रत्यक्षात चित्रित होताना तुकड्या-तुकड्यात छायाचित्रित केला जातो. अशा प्रकारच्या माहितीने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलून आल्याचे या वेळी दिसून आले. टीव्हीवर तासन्तास सलगपणे आपण पाहत असलेल्या मॅचच्या चित्रीकरणाकरिता शेकडो कॅमेरे लावलेले असतात. त्यामुळे पाहिजे तो अँगल आपल्याला चटकन पाहता येतो. याशिवाय ध्वनिमुद्रण, ध्वनिसंकलन, संगीत संकलन यांसारख्या संकल्पनांची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. विद्यापीठात कार्यरत असलेल्या कम्युनिटी रेडिओ विभागाला यानंतर देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली. आजवर केवळ ऐकून माहिती असलेल्या रेडिओविषयी प्रत्यक्षात त्याचे कामकाज कशा पद्धतीने चालते याची माहिती करून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. व्हिज्युएल मीडियमच्या जगात वावरताना ऑडिओ मीडियमपासून थोडे लांबवर असलेल्या विद्यार्थ्यांना रेडिओबद्दल फारशी माहिती नसल्याचे या वेळी पाहावयास मिळाले. एखाद दुसरा रेडिओ चॅनेल त्यांना माहिती होता. मात्र आपण रेडिओ ऐकत नाही. त्याऐवजी जास्त वेळ टीव्ही पाहण्यात जात असल्याचे त्यांच्या मनोगतातून व्यक्त होत होते. या विभागातील विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे महेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना कम्युनिटी रेडिओ, कमर्शियल रेडिओ, एज्युकेशनल रेडिओ, यासारखे रेडिओचे प्रकार समजावून सांगितले.
‘आम्हाला वाटलं बातम्या सांगणाऱ्या माणसाला त्या पाठ असतात म्हणून’..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 1:36 PM