राज्यातील बसडेपो अत्याधुनिक करणार : दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 07:00 PM2019-01-24T19:00:43+5:302019-01-24T19:02:30+5:30
राज्यातील एसटी डेपोंमध्ये मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात असून २५० अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
पिंपरी : राज्यातील एसटी डेपोंमध्ये मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात असून २५० अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच ८० डेपो नव्याने बांधण्यात येणार आहेत. अत्याधुनिक कल्पकतेचा विचार करून इमारती उभारल्या जाणार आहेत. प्रवाशांना चांगली सेवा देण्याबरोबरच सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असणार आहे, असल्याची घाेषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.
पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगर आगारात रोटरी क्लब पिंपरी टाऊन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने चालक, वाहक विश्रांती कक्षाचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी रावते बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे प्रांतपाल शैलेश पालेकर, एसटीच्या नियंत्रक मालन जोशी, रोटरीचे अध्यक्ष सदशिव काळे, परिवहन अधिकारी आनंद पाटील, व्यवस्थापक संजय भोसले, शिवसेना जिल्हा संघटक सुलभा उबाळे, अनिल नेवाळे, संतोष भालेकर, महादेव शेंडकर आदी उपस्थित होते.
रावते म्हणाले, ‘‘रोटरीने चालक आणि वाहकांसाठी विश्रांती कक्ष उभारण्याचा चांगला उपक्रम राबविला आहे. वाहक आणि चालकांना प्रवास करावा लागतो. त्यांना विश्रांती मिळावी, व्यवस्थित झोप यावी, यासाठी कक्ष उभारला आहे. तो आमच्या संकल्पनेतील नाही. राज्यातील आगारांच्या इमारती आणि तेथील मुलभूत सुविधा यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. एसटीत नव्याने ५५ हजार तरूण दाखल आहेत, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विश्रांती कक्ष आणि स्वच्छतागृहे चांगली असावीत यासाठी प्रयत्न असणार आहे. राज्यात अडीचशे अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. ’’
युतीबाबत नेते निर्णय घेतील
लोकसभा निवडणूकीतील युतीबाबत रावते म्हणाले, ‘‘शिवसेना आदेशावर चालते. आदेश आला की शिवसेना कार्यकर्ते अंमलबजावणी करतात.शिवसेना भाजपा युतीबाबत नेते निर्णय घेतील. ’’