"खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, जमिनीबाबत समाधानकारक तोडगा काढू"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 04:22 PM2021-06-13T16:22:36+5:302021-06-13T17:59:01+5:30
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार; खासदार डॉ. अमोल कोल्हे
राजगुरुनगर: रेल्वे प्रकल्प व रिंग रोड अंमलात येणे गरजेचे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत समाधानकारक तोडगा काढूनच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
खेड तालुक्यात प्रास्तावित रेल्वे व रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प येऊ घातले आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यासाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या व भावना जाणून घेण्यासाठी खासदार कोल्हे राजगुरूनगर येथे आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी समस्यांचा पाढा खासदारासमोर मांडला.
शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाचे व समस्याचे खासदार कोल्हे यांनी निरसन केले. रेल्वेमार्गबाधित शेतकऱ्यांचे संपूर्ण शंकानिरसन करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय देण्याचीच शासनाची भूमिका राहील. रेल्वेमार्ग बाधित शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाटाघाटींद्वारे ठरवली जाणार आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. रेल्वे आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांनी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्याचे प्रयत्न करणार आहे. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
खेड मध्ये होणारे विमानतळ रद्द झाल्याने खेड तालुक्याचे मोठे नुकसान झाले. पण आता पुणे नाशिक रेल्वेमुळे हा मतदार संघ थेट उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याने विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो अंमलात येणे गरजेचे असल्याच ते म्हणाले आहेत.