पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भात सर्वदूर ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढले असून बुधवारी उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मराठवाड्यातील जालना, बीड तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शिरुर ७०, कोपरगाव ६०, भोकरदन ७०, विदर्भातील भिवापूर ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. अन्यत्र मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी दिवसभरात परभणी १९, अकोला ११, नागपूर १६, वर्धा १०, मुंबई ९, चंद्रपूर ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातील औरंगाबाद तसेच जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस सर्वदूर मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशीम जिळ्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे शहरात बुधवारी आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.