पुणे : मॉन्सूनच्या आगमनापूर्वी आग्नेय अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आग्नेय अरबी समुद्रात १४ मे च्या सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ते उत्तरेकडे आणि त्यानंतर वायव्येकडे सरकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तामिळनाडु, केरळमध्ये १४ ते १६ मे दरम्यान मोठा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर कर्नाटकातील किनारपट्टी भाग व घाट परिसरात १४ मेला हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. १५ मे रोजी दक्षिण कर्नाटक परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ मे व त्यानंतर गोवा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार वारे वाहून पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर सध्या तरी चक्रीवादळाचा मार्ग पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी अरबी समुद्रात निसर्ग हे चक्रीवादळ मे महिन्याच्या अखेरीस निर्माण झाले होते. ते जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात धडकले होते. लॉकडाऊन सुरु असतानाच त्याचे कोकणात मोठा विध्वंस घडवून आणला होता.