विवाहसोहळे झालेत स्टाईलबाज!

By admin | Published: April 18, 2016 02:59 AM2016-04-18T02:59:09+5:302016-04-18T02:59:09+5:30

पूर्वी विवाहसोहळा म्हटला की, लगीनघाई सुरू व्हायची. वऱ्हाड्यांच्या धावपळीत लग्नविधीसाठी करावा लागणारा सोपस्कार पार पाडण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत हाते.

Weddings are stylish! | विवाहसोहळे झालेत स्टाईलबाज!

विवाहसोहळे झालेत स्टाईलबाज!

Next

रहाटणी : पूर्वी विवाहसोहळा म्हटला की, लगीनघाई सुरू व्हायची. वऱ्हाड्यांच्या धावपळीत लग्नविधीसाठी करावा लागणारा सोपस्कार पार पाडण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत हाते. परंतु, दोन कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या विवाहसोहळ्याचे स्वरूप आता काळानुरूप बदलत चालले आहे. विवाहाच्या तयारीपासून ते वऱ्हाड्यांना दिल्या जाणाऱ्या पंगतीतील मेनूपर्यंत यात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. घराच्या दारात मांडवात होणारे लग्न सध्या हायफाय मंगल कार्यालयात होताना दिसत आहे, तर साध्या घोड्यावरच्या वराती कालबाह्य होऊन एसी डिजिटल बसने ही जागा घेतली आहे.
ग्रामीण भागात छोटेखानी विवाहसोहळे, आदर्श विवाह, मुलगी पाहावयास गेले अन् लग्न उरकून आले, सध्या तर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यावर भर दिला जात आहे. अशा प्रकारचे विवाहसोहळे होत असले, तरी शहरांमध्ये मात्र हायटेक विवाह सोहळ्यालाच तरुणाईची जास्त पसंती आहे. लग्नविधीसाठी हळदीचा कार्यक्रम गोपाळ मुहूर्त, गोरज मुहूर्त, सायं मुहूर्त असे विविध टप्पे विवाहसोहळ्यात असतात. महिला वऱ्हाडी प्रामुख्याने हळदीच्या कार्यक्रमावर भर देताना दिसतात. काही ठिकाणी तर रात्री हळदीनंतर गाण्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. नवरदेवांमध्ये सूट, सफारी या पेहरावाला आता पसंती न देता शेरवानी आणि इंडोवेस्टर्न फॅशनच्या कपड्यांच्या ट्रेंडला महत्त्व दिले जात आहे. यातही शेरवानी, सेमी शेरवानी, धोती-कुर्ता, डिझायनर सुट या वेशभूषेचा समावेश असल्याचे दिसून येते.
नवरदेवासोबतच वधूंमध्येदेखील आता मालिकांचा व चित्रपटांचा चांगलाच प्रभाव दिसत असून, त्यामध्ये ब्रासो वेलवेट अशा विशिष्ट प्रकारच्या डिझायनर साड्यांना पसंती दिली जात आहे. तीन ते १५ हजारांपर्यंतच्या साड्यांची रेंज बाजारपेठेत उपलब्ध असून, सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या वधूकडूनदेखील महागड्या साड्यांना पसंती दिली जात आहे.
पूर्वीच्या लग्नसोहळ्यातील चालीरीतींना आता बगल दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पारंपरिक विवाह सोहळ्यांनीही आता कात टाकल्याचे चित्र आहे. विवाहासाठी होणारा अनावश्यक खर्च किंवा वस्तूंची नासाडी टाळण्यास अनेक जण प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. अक्षतांसाठी शेकडो किलो तांदूळ फुकट घालवणे हे अनेकांना पटत नाही. त्यामुळे अक्षतांची जागा आता फुलांनी घेतली आहे. विवाह सोहळ्याच्या परंपरेत बदल घडवून आणले आहेत. (वार्ताहर)

पूर्वी लग्नपत्रिका छापून घरातील मंडळी, आप्तेष्ट, स्नेहीजन व नातेवाईक यांना प्रत्यक्ष घरी जाऊन पत्रिका दिली जात असे. लग्नासाठी येणाऱ्या महिला वऱ्हाड्यांना जाण्या-येण्याचे प्रवासभाडे देण्याचीदेखील प्रथा होती. परंतु, आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात या सर्व गोष्टींना फाटा देऊन अतिशय धावपळीचा हा सोहळा व्हॉट्स अ‍ॅप, हाईक, ट्विटर, ई-मेल, आॅनलाइन पत्रिका आणि इव्हेंट मॅनेजमेंटमुळे हायटेक होत चालला आहे. विवाहसोहळ्याचा कार्यक्रम एका दिवसात उरकला जातो.

सूनमुख नव्हे सेल्फी
सूनमुख बघण्यासाठी पूर्वी आरशाचा वापर केला जात होता. पण त्याची जागा आता सेल्फीने घेतली आहे. सुनेसोबत आता सासूबाई सेल्फी काढतात.

हजारो किलो अन्न वाया
सर्वांपेक्षा काही तरी वेगळे करण्याची धडपड प्रत्येकाच्या मनात दिसून येत आहे. त्यामुळे बदलत्या लग्नसोहळ्यात अनेक प्रकारचे पदार्थ बनविले जात आहेत. इतरांपेक्षा आपल्या लग्नात जास्तीत जास्त पदार्थ बनविण्यासाठी काही मंडळी झटताना दिसून येत आहेत. शहरात थोड्याफार अंतरावर अनेक मंगल कार्यालयांत होणाऱ्या लग्नाला हजेरी लावणे काही मंडळींना कठीण नाही. परंतु, साखरपुडा, लग्नाला भेटी देण्यातच वेळ जातो.

आधुनिक पद्धतीच्या वाजंत्रीला मागणी
पूर्वी लग्नसोहळ्यात हलगी, सनई, सूर अशा वाजंत्रीचा सर्रास वापर केला जात होता. याची जागा कालांतराने ढोल, लेझीम, ताशा, बँडने घेतली. डीजे, डॉल्बी ही भयानक आवाज करणारी यंत्रे आली आणि हळूहळू ही सर्वच वाजंत्री काळाच्या पडद्याआड जाऊ लागली. छातीत धडकी भरणाऱ्या डीजेच्या तालावर तरुणाई थिरकू लागली आहे.

Web Title: Weddings are stylish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.