पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा होणार कायापालट, सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 04:11 PM2018-02-27T16:11:03+5:302018-02-27T16:11:03+5:30
पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने नुकतीच सुवर्णमहोत्सवी मजल मारली आहे. शहरातील सांस्कृतिक वैविध्य, शहराला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय महत्व, सांस्कृतिक उपक्रमांची जोमदार वाढ या सा-या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मुकूटमणी असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने नुकतीच सुवर्णमहोत्सवी मजल मारली आहे. शहरातील सांस्कृतिक वैविध्य, शहराला प्राप्त झालेले आंतरराष्ट्रीय महत्व, सांस्कृतिक उपक्रमांची जोमदार वाढ या सा-या बाबी लक्षात घेऊन महापालिकेच्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती करुन सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरात सर्व कलांना सामावून घेणारे अॅम्फीथिएटर, बालकलाकारांसाठी थिएटर, कार्यक्रमांची रंगीत तालीम असे वैविध्य निर्माण होणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
खुर्च्यांची अवस्था, अस्वच्छता, स्वच्छतागृहांमधील गायब झालेले नळ, फुटके आरसे, राजकीय कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना लावली जाणारी कात्री, कलादालनातील असुविधा, गैरसोय यामुळे गेल्या काही काळापासून बालगंधर्व रंगमंदिर वादाच्या भोव-यात सापडले आहे. सुविधांची वानवा कलावंतांनी, प्रेक्षकांनी वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्याबाबत अनेकदा पाहणीही करण्यात आली. कलाकारांच्या खोल्या, कलादालन, ध्वनिव्यवस्था, बैठकव्यवस्था, स्वच्छतागृहे अशा सुविधांच्या माध्यमातून वर्षभरात रंगमंदिराचा कायापालट केला जाणार आहे, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सादर झालेल्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात तज्ज्ञांची समिती नेमून, सविस्तर अहवाल तयार करुन रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, बालगंधर्व रंगमंदिराचे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त थिएटरमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. विविध आकारांची आणि वैशिष्ट्यांची सुसज्ज थिएटर्स, मुबलक पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधा यांचा समावेश होऊन बालगंधर्व केवळ पुण्याचेच नव्हे, तर देशातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होण्याच्या उद्देशाने पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी तज्ज्ञांचा समावेश असणारी समिती नियुक्त करुन तिला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात येणार आहे.
संवाद, पुणेचे सुनील महाजन म्हणाले, ‘गोव्याच्या कला अकादमीच्या धर्तीवर बालगंधर्व रंगंमदिराचा कायापालट होऊ शकतो. लहान मुलांसाठी थिएटर, अॅम्फीथिएटर अशा माध्यमातून रंगमंदिराचा विकास साधता येऊ शकतो. पुण्यामध्ये अनेक सभागृहे पांढ-या हत्तींप्रमाणे पोसली जात आहेत. त्यामुळे कल्पना चांगली असली तरी ती व्यवस्थित अमलात आणणे गरजेचे आहे. रंगमंदिराचे नाव कायम ठेवून या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी.’
बालगंधर्व रंगमंदिर ही पुण्याची शान आहे. हा वारसा कायमस्वरुपी जतन करायचा असेल तर त्यासाठी पुनर्विकासाची योजना स्वागतार्ह आहे. रंगमंदिराच्या उभारणीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगीत तालीम, सांगितिक कार्यक्रम, एकपात्री प्रयोग अशा प्रयोगांसाठी वेगवेगळे छोटेखानी सभागृह बांधता येऊ शकेल. रंगंदित अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज झाल्यास जागतिक पातळीवरील कार्यक्रमही येथे सादर होऊ शकतात. बालगंधर्वला जगविख्यात थिएटरचे रुप द्यायचे असेल तर १० कोटी रुपयांचा निधी अपुरा पडेल, असे वाटते.
- मोहन कुलकर्णी, मनोरंजन, पुणे