पुणे: पुण्यात कोरोनाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसागणिक २,३ हजारांच्या संख्येत रुग्ण आढळून येत आहेत. तर ५०, ६० रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. दुसऱ्या लाटेत अनेकांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यामुळे राज्यासहित अनेक जिल्ह्यातही ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा कठीण काळात लोहगावातील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. सामान्य रुग्णाबरोबबरच गंभीर, अत्यवस्थ अशांनाही हे तरुण ऑक्सिजन पुरवण्याचे कार्य करू लागले आहेत.
लोहगाव येथील प्रशांत जगताप या तरुणाने स्तुत्य उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्याच्याबरोबर अविनाश पोथवडे, सौरभ जगताप, दत्तात्रय जाधव, विश्वजित पोतेकर हे सर्वही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
मागच्या आठवड्यात प्रशांत जगताप यांचा भाऊ सौरभ जगतापचे लग्न होते. त्याच्या लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा विचार होता. पण सध्याची परिस्थिती पाहून हे पैसे समाजउपयोगी कामासाठी वापरावेत असे ठरवले. त्यांनी या पैशातून ऑक्सिजनचे ३६ सिलेंडर विकत घेतले. नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना २५ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांची आत्या कोरोनामुळे गंभीर अवस्थेत होती. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यावेळी जगताप यांनी खूप प्रयत्न करूनही बेड मिळत नव्हता. अखेर उशीर झाल्याने आत्याने प्राण सोडला. म्हणून लोकांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने हा उपक्रम चालू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिलेंडरची संख्या १०० वर पोहोचवण्याचा मानस
पुण्यात अजूनही कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. आता आमच्याकडे ३६ सिलेंडर आहेत. काही संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सिलेंडर घेण्यासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ३६ हा आकडा लवकरच १०० किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.