उंबरा तेवढा शिल्लक ‘घराचे’ काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 02:04 AM2018-09-30T02:04:38+5:302018-09-30T02:05:08+5:30
नवीन घरांची उभारणी करा; पीडितांची मागणी : शासनाची मदत आमच्यापर्यंत येईल का?
पुणे : कुठं दरड पडली, भूकंप झाला, पूर आला असं काही झालं तर शासनाकडून मदत होते. यात वेगळं काही नाही. मात्र त्या मदतीचा फायदा गरजुंनाच होत असल्याचे दिसून येत नाही. मुळा कालव्यातील दुर्घटनेत ज्यांची घरे वाहून गेली अशांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाने व पालिकेने कबुल केले आहे. यावर पीडितांनी ती मदत फारच अपुरी असून आपल्याला नवीन घर बांधून देण्याची मागणी केली आहे. तसेच पंचनामे करून घेण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न उपस्थित करून जाहीर केलेली मदत आमच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहनदेखील केले आहे.
गुरुवारी दांडेकर पुलाजवळ मुठा कालव्याला भगदाड पडून वेगाने पाण्याचा प्रवाह झोपडपट्टीवस्तीत शिरला. यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर तातडीने पालिका व जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी मदत पुरवली. या मदतीमुळे सध्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीविषयी मात्र अनेक पीडितांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सगळा संसार पाण्यात वाहून गेला असताना पालिकेकडून ११ व ६ हजारांची देण्यात येणारी मदत कितपत पुरणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अनेकांचे पंचनामे अद्याप बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. दरवेळी पालिका व प्रशासनाकडून मदत जाहीर केली जाते. परंतु प्रत्यक्षात ती मिळण्याची शाश्वती शंकास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाची मदत याविषयी माहिती देताना स्थानिक रहिवासी महेश ननावरे यांनी सांगितले, पाण्याच्या प्रवाहात ज्यांची घरे गेली आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने घरे मिळण्याची व्यवस्था पालिकेने करावी. आपला सगळा संसार पाण्यात गेला असताना प्रशासनाने कमी मदत देवून उगाच त्यांची थट्टा करू नये. प्रमोद कुंभार यांचे दांडेकर पुलवस्ती या ठिकाणी स्वत:च्या मालकीचे गॅरेज असून त्यांनी अद्याप अनेक गाड्यांचे पंचनामे बाकी असल्याचे सांगितले. जोरदार पाण्याच्या प्रवाहाने अनेक गाड्यांची इंजिने वाहून गेली. दरम्यान, दोन दिवसानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी अद्याप स्वच्छता बाकी होती. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसल्याने त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. कालवा फुटीनंतर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शनिवारपर्यंत तो बंदच असल्याचे दिसून आले. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होता.
तातडीने घर द्या... बाकीचे कष्टाने मिळवू
घरातील ज्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या त्यांची किंमत पालिकेने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. ६ आणि १२ हजारांच्या मदतीने काय होणार आहे? वाटल्यास ते पैसे देऊ नका. पण आमची घरे तेवढी लवकरात लवकर बांधून द्या. बाकी आम्ही आमचे कष्टाने मिळवू. जिथे घरातला देव वाचविण्यासाठी वेळ नाही मिळाला तिथे मौल्यवान वस्तुंची काय गोष्ट. घरातली माणसे वाचली हेच महत्त्वाचे, अशी आर्त भावना पीडित सिंधू जाधव यांनी व्यक्त केली.
वस्तीत पुन्हा शिरले पाणी
शनिवारी दुपारी दुरुस्तीच्या कामाकरिता कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पुन्हा या वस्तीतील काही ठिकाणी पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला.