गहू कापणीचे दर वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:02+5:302021-02-26T04:12:02+5:30
लाखेवाडी : इंदापूर तालुक्यात गेली दहा दिवसांपासून तापमानात घट होऊन निर्माण झालेल्या पोषक हवामानामुळे सध्या गव्हाचे मळे ...
लाखेवाडी : इंदापूर तालुक्यात गेली दहा दिवसांपासून तापमानात घट होऊन निर्माण झालेल्या पोषक हवामानामुळे सध्या गव्हाचे मळे फुलल्याचे चांगले चित्र तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहे. परिणामी, गव्हाचे पीक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा देईल, असे असले तरी कापणीच्या दरात वाढ होणार आहे.
गहू पिकास साधारणत: सात ते आठ पाण्याची आवर्तन लागतात. चालू वर्षी समाधानकारक पावसामुळे या पिकासाठी पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे, जवळच असणाऱ्या उजनी धरणामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला गायब झालेली थंडी आता जाणवू लागली आहे. सध्या अचानकपणे निर्माण झालेले रात्रीचे थंड वातावरण हे फुलोरा अवस्थेत असलेल्या गहू पिकास फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लोंबीचा आकार व दाण्याचे वजन वाढून उत्पादनात वाढ होणार आहे. ऊस पिकाचा खोडवा तुटल्यानंतर गव्हाचे पीक शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, सध्या पीक-पाण्याची स्थिती चांगली असल्याने शेतकरीवर्गात उत्साह दिसून येत आहे.
कोट
सध्याचे वातावरण हे गहूवाढीसाठी पोषक असून बावडा व परिसरात गव्हाचे क्षेत्र वाढले असून, नक्कीच गहू उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.
- किशोर कदम, कृषी सहायक
गहू कापणीच्या हार्वेस्टिंग मशीन पंजाब या राज्यातून महाराष्ट्रात एजंटमार्फत कमिशन देऊन आणल्या जातात, गेल्या वर्षी कापणीचे दर एकरी २००० ते २२०० दरम्यान होते. परंतु, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने, या वर्षी किमान २८०० ते ३००० एकरी दर राहतील.
- महावीर यादव, एजंट हार्वेस्टिंग मशीन