पुणे : जगात माणुसकी संपली आहे, सारेजण स्वार्थी झाले आहेत असा सूर अनेकदा उमटत असतो. पण पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकाराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या जखमी झालेल्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी अनेक गाड्यांना हात करून कोणीही न थांबाल्याचा संवेदनाहीन अनुभव त्यांना आला आहे.
राव हे त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा अंजनेय, मुलगी वासवी यांच्यासह पाषाण भागात सायकलिंग करत होते. त्याचवेळी अंजनेय याच्या सायकलीला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरात ही घटना घडली. यामुळे त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. राव यांनी तातडीने ती स्थिती बघून अंगावरील टी शर्ट काढून त्याच्या जखमेला बांधला. यावेळी सोबत असलेली त्यांची मुलगीही घाबरून गेली होती. या परिस्थितीत राव यांनी रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या सुमारे पंधरापेक्षा अधिक गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने कोणाचेही मन द्रवले नाही. काहीं हृदयशून्य व्यक्तींनी तर परिस्थिती बघितली आणि मदत न करता निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला. हताश राव तरीही अनेक गाड्यांना हात करत होते.
शेवटी एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहन चालकाने गाडी थांबवली आणि राव यांनी मुलासह रुग्णालय गाठले. त्यानंतर त्याला एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि लगेचच तात्काळ शस्त्रक्रियाही करण्यात आली. गेल्या दोन दिवसापासून अंजनेय याची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र गरजू व्यक्तीच्या मदतीला धावणारे असा लौकिक असणाऱ्या पुणेकरांची मान मात्र या प्रकाराने खाली गेली आहे.