'नाना पुण्यात कधी येताय..., ते सांगा'; पटोलेंविरोधात भाजपकडून फ्लेक्सबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:42 PM2022-01-18T16:42:57+5:302022-01-18T16:43:14+5:30
शहरातील साने गुरुजी रस्त्यावर पटोले यांच्या विरोधात नाना पटोले बरळले अशी फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली.
पुणे : 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं मोदींबाबत खळबळजनक वक्तव्य नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमात केलं होत. त्यावरून भाजपच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांकडून पटोले यांच्यावर टीका होऊ लागली आहे. पुण्यातून महापौर मुरलीधर मोहोळ यांनीसुद्धा त्यांना येरवड्यात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. तर शहरातील साने गुरुजी रस्त्यावर पटोले यांच्या विरोधात 'नाना पटोले बरळले' अशी फ्लेक्सबाजी पाहायला मिळाली.
''नाना आपण पुण्यात कधी येताय ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत, आम्ही स्वागत कसे करतो ते आपल्या सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जितुद्दीनला विचारा'' अशा प्रकारचा मजकूर असणारा फ्लेक्स भाजपचे धीरज घाटे यांनी लावला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले
'मी का भांडतो. गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो.
मोहोळ यांचा सवाल
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या. आणि पुण्यातल्या 'येरवड्या'त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नावापुरता का होईना, पण 'राष्ट्रीय' पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने मा. पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये? असा सवालही मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो - नाना पटोले यांचा खुलासा
जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितले.